*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ*
*लोकप्रतिनिधी व सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग द्यावा
– आमदार डॉ. देवराव होळी*
गढ़चिरोली प्रतिनिधि-सूरज कुकुडकर
गढ़चिरोली- माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाची असून त्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सक्रिय सहभाग द्या असे आवाहन गडचिरोली मतदारसंघाचे आमदार डॉ. देवराव होळी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी केले. आज गडचिरोली जिल्ह्यातील माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी झालेल्या मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, नगराध्यक्ष श्रीमती योगिता पिपरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, डॉ. विनोद मशाखेत्री, डॉ. पंकज हेमके, डॉ. सुनिल मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार श्री. होळी म्हणाले की या मोहिमेत प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघात लोकांना आवाहन करुन संसर्ग रोखण्यासाठी कार्य करावे. लोकांच्यात आता कोरोनाची भिती राहिली नाही. लोकांनी भिती सोडली त्याबरोबर खबरदारी घेणेही कमी केले ते चुकिचे असून मास्क, सॅनिटायझर व सामाजिक आंतर राखणे अशा बाबी अंगिकारल्या पाहिजेत. जिल्हा प्रशासनाने गडचिरोली जिल्ह्यात कोरोनावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळविले आहे. या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने आलेल्या पथकाकडून आपली तपासणी करुन घ्या. तसेच लक्षणे असल्यास कोरोना चाचणी तातडीने करा. आपल्या कुटुंबाची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन आमदार होळी यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मोहिमेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले 558 पथके 15 दिवस प्रत्यक्ष घराघरात जावून नागरिकांची तपासणी करणार आहेत. त्याचबरोबर त्यांना आरोग्य शिक्षणही देणार आहेत. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात मोहिमेतील विविध वाचन साहित्य, प्रचार प्रसिद्धी साहित्य व कोरोना दूतांसाठी वापरण्यात येणाऱ्या टी शर्ट, टोपी यांचे विमोचन करण्यात आले.
*गडचिरोली बाजारपेठ सप्टेंबर दि. 23 ते 30 पर्यन्त पूर्णपने बंद*
मागील काही दिवसांपासून गडचिरोली शहरात कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे काही नागरिकांचा मृत्यु झालेला आहे . हा वाढत असलेला प्रसार थांबविण्यासाठी व जनतेचे सुरक्षा हित लक्षात घेऊन गडचिरोली शहरातील व्यापारी संघटना, नगर परिषद गडचिरोली व सर्व पक्षीय नेत्यांनी दिनांक 23 ते 30 सप्टेंबर 2020 ला बुधवार ते बुधवार गडचिरोली शहर पूर्ण पणे बंद ठेऊन जनता कर्फ्युचा निर्णय घेतलेला आहे.
या निर्णयानुसार शहरातील दूध, औषधीचे ( medicals) व कृषिकेन्द्र ही दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी राहील. या जनता कर्फ्युला गडचिरोली शहरातील नागरिकांनी व व्यावसायिकांनी आपापली जबाबदारी ओळखून सहकार्य करावे. कोणीही अकारण आपल्या घराबाहेर पडणार नाही याची दक्षता घ्यावी . वैद्यकीय सेवा व मेडिकल नियमाप्रमाणे सुरूच राहणार असून या जनता कर्फ्युला सर्व जनतेनी सहकार्य करून यशस्वी करावे असे आव्हान शहरातील व्यापारी संघटना, नगर पालिका व सर्व पक्षीय नेत्यांनी केले आहे.