*पुलाला कठडे मागणाऱ्या युवकावर कारवाई*

*केळवद येथील सामाजिक कार्यकर्ता अन्न-पाणी त्याग आंदोलनावर*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः तालुक्यातील केळवद गावातील पुलावर संरक्षक कठडे बसवण्याची मागणी करत आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता अक्षय राजू भुजाडे याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, या कारवाईच्या निषेधार्थ अक्षय भुजाडे सध्या अन्न-पाणी त्याग आंदोलनावर बसले आहेत.*
*तालुक्यातील गांधीवादी गाव म्हणून ओळखले जाणारे केळवद गावातील पुलावरून वारंवार अपघात घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर, काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेस पाण्यात पडण्याची घटना घडली होती. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पुलाला संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी अक्षय भुजाडे यांनी ग्रामपंचायत, तहसील व प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून केली होती. मात्र, मागणीची दखल न घेतल्याने त्यांनी नाल्यात उतरून आंदोलन केले होते.*

*या आंदोलनानंतर केळवद पोलिस व तहसील प्रशासनाच्या मध्यस्थीने तीन दिवसांत पुलावर कठडे बसवण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानंतर अक्षय भुजाडे यांनी आंदोलन स्थगित केले. मात्र, तीन दिवसांचा कालावधी उलटूनही पुलावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.*

*उलट, गावाच्या सुरक्षिततेसाठी आंदोलन करणाऱ्या अक्षय भुजाडे यांच्यावर भा.ना.सु.स. कलम 129 व 130 अंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी 14 जानेवारी रोजी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. 15 जानेवारीपासून त्यांनी पाणीही घेणे बंद केले असून, आज आंदोलनाला 72 तास पूर्ण झाले आहेत.दरम्यान, पोलिस प्रशासनाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. अक्षय भुजाडे यांनी दूरध्वनीवर प्रतिक्रिया देताना, आपण समाजासाठी व लोकांच्या जीवासाठी लढत असल्याचे सांगत, आपल्यावर राजकीय दबावातून कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला आहे. आपण दोषी असाल तर जिल्हाधिकाऱ्यांनी ते स्पष्ट करावे, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.*

*या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज