*प्रहारने पितळ पाडले उघडे ; कार्यालयाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच*
*वर्ध्यातील तालुका भूमिअभिलेख कार्यालयात रंगते “झूम बराबर झूम” ओली पार्टी*
वर्धा तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील काही कर्मचारी तसेच दलाल या कार्यालयातच दारू ढोसतात. हे मद्यशौकीन इतक्यावरच थांबत नाही तर ते दारू ढोसल्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या त्याच कार्यालयाच्या आवारात फेकुन देतात.
वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकडे
वर्धा: स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या तालुका भूमिअभिलेख कार्यालयात ओल्या पार्ट्या रंगत असून मनसोक्त दारू ढोसल्यावर कार्यालयाच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्या टाकल्या जात असल्याने या कार्यालयातील प्रमुख्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी सोमवारी प्रहारच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी तसेच तालुका भूमिअभिलेख कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील काही कर्मचारी तसेच दलाल या कार्यालयातच दारू ढोसतात. हे मद्यशौकीन इतक्यावरच थांबत नाही तर ते दारू ढोसल्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या त्याच कार्यालयाच्या आवारात फेकुन देतात. दारूबंदी जिल्हा म्हणून वध्यार्ची ओळख. परंतु, तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील हा मनमर्जी कारभार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिव्याखालील अंधार दाखविणाराच ठरत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणाचा परिचय देण्यासह बदनामीस कारणीभूत ठरत आहे. दारूबंदी जिल्ह्यातील जिल्हाकचेरीच्या आवारात रंगणाऱ्या ओल्या पार्ट्या दारूबंदीचे पितळ उघडे करीत आहे, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी करून चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांनी केले. आंदोलनात राजेश सावरकर, महेंद्र डंभारे, नीतेश किनेकर, मंगेश मुळे, भुषण येलेकार, शुभम भोयर, प्रितम कातकिडे, ऋषिकेश पाचकवडे, शैलेश कोसे, विक्रम येलेकार, अभिषेक चौधरी, प्रफुल्ल वरठी, मुकेश वाघमारे, आदित्य कोकडवार, मंगेश मुडे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली कानउघाडणी
प्रहारच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले जात असल्याची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी त्यांचे दालन गाठून आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान तालुका भूमिलेख अधिकारी भूजाडे, अधीक्षक पवार यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर हे अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात येताच सुनील कोरडे यांनी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा विषय पुढे करून तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. शिवाय २४ तासांत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारीही झाले आश्चर्यचकीत
काही कामानिमित्त बाहेर असलेले जिल्हाधिकारी विवेक भीमनवार हे त्यांच्या कार्यालयात दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास परत आले. अचाक आपल्या दालनासमोर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पाहून तेही आश्चर्यचकीत झाले. शिवाय हा प्रकार नेमका काय याची माहिती त्यांनी जाणून घेतली