*अनिकेत दुर्गे गोंडवाना विद्यापीठ उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित*
गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुडकर
गडचिरोली – गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा विद्यापीठाच्या नवव्या वर्धापन दिनाच्या शुभमुहूर्तावर वर्षभरात विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयामध्ये शैक्षणिक, क्रीडा साहित्य व उत्तम चारित्र्य याव्यतिरिक्त देश सेवेकरिता व समाजात साठी उत्कृष्ट कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
वर्षभरातील विविध सामाजिक उपक्रमाचा विचार करता सुशिलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली येथील प्रतिभासंपन्न विद्यार्थी अनिकेत नामेश्वर दुर्गे या विद्यार्थ्याला विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातून उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सन्मानपत्र, वृक्ष, स्मृतिचिन्ह,शाल, श्रीफळ व रोख रक्कम बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
अनिकेत नामेश्वर दुर्गे हा विद्यार्थी अलौकिक प्रतिभासंपन्न गुणांचा वारसा पुढे चालवण्यासाठी धडपडणारा युवावक्ता. जन्म, संस्कार, परिस्थिती या गोष्टी माणसाच्या हातात जरी नसल्या तरी पुढे आलेल्या संधीचे सोने करून स्वप्रयत्नाने व मार्गदर्शनाने व्यक्ती घडत असतो असाच संवेदनशील तसेच अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला, प्रचंड इच्छाशक्ती असलेला व त्यासाठी अथक परिश्रम घेणारा प्रतिभा संपन्नतेचा धनी युवा वक्ता म्हणजे अनिकेत.
वक्ता जन्मावा लागतो असे म्हटले जाते परंतु अनिकेत स्वप्रयत्नाने घडला. प्राथमिक शिक्षणापासून आज महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत कधीही आपल्या आर्थिक परिस्थितीचे भांडवल करून तो जगला नाही तर वातावरणानुसार स्वतःला जुळवून घेऊन विद्यार्थीदशेपासूनच विविध सामाजिक परिवर्तनवादी संघटनांशी जुळला व त्यातून तो घडला. आज तो प्रबोधन विचार मंचचा युवा संयोजक आहे. अनिकेतने कमी वयातच शैक्षणिक व सामाजिक कार्यात मोठा पुढाकार घेऊन प्रगती केली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी या मुळ गावात प्राथमिक शिक्षण घेतलेल्या या युवकाने पुढील शिक्षण चंद्रपूर येथील भवानजीभाई विद्यालयातून घेतले तर महाविद्यालयीन शिक्षण सुशिलाबाई रामचंद्र मामिडवार या महाविद्यालयातून घेत आहे.
नित्यनूतन कार्याने नेहमी प्रकाशझोतात राहणारा अनिकेत कोविड – 19 च्या भयाण परिस्तिथीत गावातील सर्व शाळा बंद असताना गावातील विद्यार्थी घडावे, मोठे व्हावे हा उदात्त हेतू ठेऊन विहाराच्या वास्तू मधून गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे, विविध कलेंचे, व संस्काराचे धडे देत आहे.
अनिकेत ने आपल्या अष्टपैलू कामगिरी ने शिक्षण घेत असणाऱ्या शाळा व महाविद्यालयाचे तसेच आपल्या आई वडिलांचे आणि गावाचे नाव मोठे केले आहे. उत्कृष्ट विद्यापीठ पुरस्कार प्राप्त आनिकेतचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे व पुढेही सामाजिक कार्यात अग्रेसर राहून वाटचाल करावी अशी शुभेच्छा मार्गदर्शक शिक्षकांकडून, मित्रपरिवाराकडून व्यक्त केल्या जात आहे.
या पुरस्काराचे श्रेय अनिकेतने त्याचे आई-वडील, गावकरी, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा जुनिअर महाविद्यालयाचे शिक्षक व समाजकार्य महाविद्यालय पडोली येथील प्राचार्य डॉ.सुनील साकुरे व सर्व प्राध्यापक यांना दिले.