*मेट्रोच्या ३३३ कोंटीच्या विस्ताराचा मार्ग मोकळा – गृहमंत्री अनिल देशमुख*
कोंढाळी प्रतिनीधी- दुर्गाप्रसाद पांडे
नागपूर – मेट्रोचा विस्तार करुन नरखेड, वर्धा, रामटेक व भंडारा ही शहरे जोडण्याची मागणी अनेक दिवसापासुन सुरु होती. आता या ३३३ कोंटीच्या विस्तार प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. महामेट्रोने या संदर्भात सादर केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिल्याची माहीती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी अनिल देशमुख हे सात्यत्याने पाठपुरावा करीत आहे.
नरखेड, वर्धा, रामटेक व भंडारा ही शहरे या प्रकल्पाच्या माध्यमातुन जोडली जाणार आहे. या मार्गावर ब्रॉडगेज ( बिजी ) वातानुकुलीत मेट्रो ट्रेन्स धावणार आहेत. या प्रकल्पासाठी ३३३.६० कोटी रुपये खर्च होणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे अर्थसहाय्य म्हणुन २१ कोटी ३० लाख एवढी रक्कम बिनव्याजी कर्ज म्हणुन देण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिली असून तसा आदेश गुरुवार दि.१९ नोव्हेबर २०२० ला काढण्यात आला असल्याची माहीती सुध्दा अनिल देशमुख यांनी दिली आहे.
काटोल – नरखेड मार्ग हा सर्वात जास्त म्हणजे ८५.५३ किमीचा असून यात ११ स्थानके राहणार आहे. भंडारा मार्ग ६२.७ किमीचा असून यात ११ स्थानके राहणार आहे. वर्धा मार्ग हा ७८.८ किमीचा असून यात ८ स्थानके राहणार आहे. रामटेक मार्गावर ८ स्थानके असून हा मार्ग ४१.६ किमीचा राहणार आहे. या प्रकल्पामुळे या सर्वच मार्गावरील शहरे आणि गावे हे नागपूर सोबत जोडली जात असल्याने याचा फायदा हा सामान्य नागरीकांना होणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण होण्यसाठी माझे प्रयत्न सुरु असल्याचे सुध्दा अनिल देशमुख यांनी सांगीतले.