*शनिवार रविवार जिल्ह्यात नागरिकांनी बंद पाळावा ;गरज नसेल तर बाहेर पडू नका – पालक मंत्री नितीन राऊत*
* १४ मार्चपर्यत लॉकडाऊनमध्ये वाढ
* लसीकरणाला गतीमान करणार
* दारूची दुकाने शनिवार -रविवार बंद
* व्यापारी प्रतिष्ठाने उद्या -परवा बंद,
* शाळा महाविद्यालये १४ मार्च पर्यंत बंद
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
नागपूर – : नागपुरात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी गेल्या आठवड्या प्रमाणेच उद्या शनिवार रविवार नागरिकांनी गरज नसेल तर बाहेर पडूच नये, असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आहे. प्रशासनाने या परिस्थितीत पुढील 14 मार्च पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पालक मंत्री नितीन राऊत यांनी आज जाहीर केलेल्या संदेशामध्ये नागपूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी उद्या देखील प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच राहावे, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यामध्ये चाचण्यांची संख्या वाढते आहे. सोबत बाधितांचे आकडे देखील वाढत आहे. गेल्या वर्षीची परिस्थिती उद्भवू नये यासाठी नागरिकांनी संयम पाळावा व शनिवार, रविवारी घरीच राहावे, असे कडकडीचे आवाहन त्यांनी केले आहे.
विदर्भात अन्य शहरात मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत नागपूर व जिल्ह्यातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने उद्या बंद ठेवण्यात येणार आहे.मॉल पासून तर किराणा दुकाना पर्यंत सर्व प्रतिष्ठाने उद्या बंद राहतील. उद्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार तसेच दारूची दुकाने बंद राहणार आहे. तथापि मांस, अंडी, मासे विक्रीसाठी शनिवार-रविवार सूट देण्यात आली आहे. दारू विक्री संदर्भात दुकाने बंद असली तरी घरपोच सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, यांनी संयुक्तपणे दिलेल्या माहितीमध्ये पुढील एक आठवडा लॉकडाउन वाढविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शाळा कॉलेजेस 14 मार्च पर्यंत तूर्तास बंद असतील. यासंदर्भातील पुढील आदेश पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येतील.
सर्व लॉन्स, मंगल कार्यालय, रिसॉर्ट, बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोणत्याही सार्वजनिक उपक्रमाचे कुठेही आयोजन करु नये. कार्यक्रम आयोजन करण्यात आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मंगल कार्यालयामधील लग्न बंद करण्यात आले असून घरी देखील लग्न करायचे असल्यास परवानगी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन टाळावे, असे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले आहे.
अर्थचक्राला बसू नये यासाठी सोमवार ते शुक्रवार सर्व व्यवहार सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. मात्र गेल्या वर्षीची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी नागरिकांनी देखील गरज नसेल तर शनिवार-रविवार सोबतच अन्य दिवशी देखील घराबाहेर पडू नये, मास्क वापरावा, सामाजिक अंतर ठेवावे, सॅनीटायझरचा वापर वाढवावा, ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरण मोहिमेकडे लक्ष द्यावे, सर्व ज्येष्ठांना याचा लाभ मिळेल याची काळजी घ्यावी, तसेच मोठ्याप्रमाणात तपासणी केंद्र वाढविण्यात आले असून थोडी जरी लक्षणे असेल तर तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी निवेदनात केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज