*राज्यातील महिला काँग्रेस संघटना बुथ स्तरापर्यंत सक्षम करा – नाना पटोले*
*कोरोना संकटाच्या मदतकार्यात काँग्रेस रणरागिणींचाही सक्रीय सहभाग*
*घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या भगिनींच्या मदतीसाठी महिला काँग्रेसने जिल्ह्यात स्वतंत्र सेल स्थापन करावा – यशोमती ठाकूर*
विशेष प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
मुंबई / नागपुर – कोरोनाच्या संकटात जनतेला मदत करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सक्रीय आहेत. या संकटकाळात काँग्रेसच्या रणरागिणींनीसुद्धा मागे न राहता जनतेच्या मदतीला धावून गेले पाहिजे. कोणाचीही वाट न पहाता आहे त्या साधनांच्या मदतीने मदत कार्य सुरु ठेवा, पक्ष व सरकार आपल्याबरोबर आहे. लसीकरणासाठी आपल्या शेजारच्या गरिब कुटुंबातील लोकांना दत्तक घेऊन त्यांचा लसीकरणाचा खर्च महिला कार्यकर्त्यांनी स्वतः करुन तो निधी मुख्यमंत्री मदत निधीत जमा करावा, असे आवाहन करून राज्यातील काँग्रेसचे महिला संघटन बुथ लेवलपर्यंत सक्षम करण्याचे काम झाले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संघटनात्मक आढावा तसेच कोरोना संकटात महिला काँग्रेसचे योगदान यावर चर्चा झाली. या बैठकीत प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा महिला काँग्रेसच्या प्रभारी आ. प्रणिती शिंदे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी सहभाग घेतला.
यावेळी मार्गदर्शन करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, कोरोनाच्या गंभीर संकटाचा इशारा देत करावयाच्या उपाययोजनासंदर्भात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांनी मोदी सरकारला वारंवार सुचना केल्या पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. या संकटातही भाजपा राजकारण करत आहे, त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याकामी महिलांनीही पुढाकार घेतला पाहिजे. कोरोना संकटात लोकांना मदत करण्याकामी कमी पडू नका. राजकीय पातळीवर भाजपाशी दोन हात करायला सदैव तत्पर राहिले पाहिजे. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाते, जिल्हा कमिट्यापासून राज्य पातळीवर महिलांना योग्य ते प्रतिनिधित्वही दिले जाईल.
यावेळी बोलताना महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, कोविडमुळे आईवडील दगावल्याने अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेण्याच्या नावाखाली काही लोक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा अनाथ मुलांची माहिती मिळताच ती जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यावी. या मुलांना सुरक्षित घर देण्याची तयारी असून २१ वर्षांखालील अशा अनाथ मुलांची सुरक्षित राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच कोरोनाच्या काळात घरगुती हिंसाचार वाढत असल्याचे दिसून आलेले असून अशा हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांच्या मदतीसाठी महिला काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर स्वतंत्र सेल स्थापन करावा. या सेलच्या माध्यमातून पीडित भगिनीला मदत करण्यासाठी कायदे तज्ञ सदस्य नेमता आले तर त्याचा आणखी फायदा होईल. याकडे महिला काँग्रेसने लक्ष द्यावे.
महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर सक्रीय झाले पाहिजे. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप अकाऊंट उघडून सक्रीय सहभाग नोंदवावा अशी सुचना आ. प्रणिती शिंदे यांनी केली.
या ऑनलाईन बैठकीत सर्व जिल्हा व शहर महिला अध्यक्षांनी सहभाग घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात कोविड संकटात मदत कार्य कसे सुरु आहे याची माहिती दिली तसेच काम करताना येत असलेल्या अडचणी, समस्या मांडल्या तसेच काही सुचनाही केल्या. या अडचणी सोडवण्याचे आश्वासनही पटोले यांनी यावेळी दिले.