*‘यु ट्युब’ आणि ‘पोर्टल’ चालविणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न धसास लावण्यासाठी*
*मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न ‘महाराष्ट्र सोशल मिडीया परिषदेत’ सहभागी व्हा*
*मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एस. देशमुख यांचे आवाहन*
धुळे- सांप्रतच्या काळात सोशल मिडियाचं महत्त्व नव्यानं सांगण्याचं कारण नाही. सोशल मिडियानं आपलं जीवन व्यापून टाकलं असल्यानं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना देखील सोशल माध्यमाची गरज वाटायला लागली आहे. त्यामुळेच मोठयातले मोठे चॅनल देखील आमच्या ‘यु ट्यूब चॅनल’ला सबस्क्राईब करा अशा जाहिराती करीत आहे. सोशल मिडियाचा वापर आणि ‘युट्यूब चॅनल’ला लोकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता पुढील काळ युट्यूब आणि पोर्टलचा आहे. म्हणूनच काळाची पाऊले ओळखून मराठी पत्रकार परिषदेने ‘महाराष्ट्र सोशल मिडीया परिषद’ ही संलग्न शाखा सुरु केली असून परिषदेच्या नव्या व्यवस्थेच्या माध्यमातून ‘युट्यूब’ आणि ‘पोर्टल’ चालविणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न धसास लावण्यासाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी महाराष्ट्र सोशल मिडीया परिषदेचा हिस्सा होऊन एकजुटीने आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सिद्ध व्हावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
एस.एम. देशमुख यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, नव्या पिढीतील पत्रकार मोठ्या संख्येने, नव्या व्यासपीठाचा वापर करतांना दिसत आहेत. नवीन माध्यमं समोर येत असतानाच या माध्यमातील पत्रकारांना भेडसावणारे प्रश्न देखील समोर येत आहेत. व्यक्तिगत पातळीवर एकटा पत्रकार या समस्यांचा मुकाबला करू शकत नाही अथवा आव्हानांना सामोरं जाऊ शकत नाही. संघटीतपणेच नव्या माध्यमातील आव्हानांना सामोरं जाता यावं यासाठीच आपण “महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद” ही मराठी पत्रकार परिषदेची शाखा सुरू केली आहे.
मराठी पत्रकार परिषद ही मराठी पत्रकारांची सर्वात जुनी अशी संस्था आहे. परिषदेने गेल्या 82 वर्षात पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन, पत्रकार आरोग्य योजना, बाळशास्त्री जांभेकर स्मारकासह पत्रकारांचे असंख्य प्रश्न मार्गी लावले आहेत. परिषदेने जे प्रश्न हाती घेतले ते चिवटपणे लढा देत सोडविले आहेत.. सोशल मिडिया परिषद देखील याच जिद्दीने काम करणार आहे. सोशल मिडिया परिषदेच्या शाखा सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात सुरू करण्यात येत आहेत. अगोदर जिल्ह्याची टीम निवडली जाईल. त्यानंतर ही जिल्ह्याची टीम तालुका शाखा स्थापन करील. हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सोशल मिडिया परिषद ही मराठी पत्रकार परिषदेचीच एक शाखा असल्याने जिल्हा पत्रकार संघ आणि सोशल मिडिया परिषद परस्पर पूरक आणि एकमेकांच्या हातात हात घालून काम करणार आहेत.
सोशल मिडिया परिषदेचे राज्य निमंत्रक म्हणून बापुसाहेब गोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सोशल मिडियातील ज्यांना परिषदेच्या नव्या प्रवाहात सहभागी व्हायचं आहे त्यांनी शरद पाबळे (9822083111), बापुसाहेब गोरे (9822222772) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी केले आहे.