*चला… नव्या पिढीला सांगूया स्वातंत्र्याच्या बलिदान कथा !
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यां
चे आवाहन*
नागपूर : ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले अशी एक पिढी आता काळाच्या आड गेली आहे. मात्र आम्हाला असणाऱ्या बलिदानाचा वारसा नव्या पिढीला कळला पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यातील घराघरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व त्या माध्यमातून देशाचा स्वातंत्र्यलढा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज येथे केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अर्थात ‘इंडिया अॅट सेवन्टी फाईव्ह’, या उपक्रमाच्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये त्या मार्गदर्शन करीत होत्या. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, कृषी विभाग व जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, पोलीस व होमगार्ड विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग,नेहरू युवा केंद्र समन्वयक, केंद्र शासनाचे क्षेत्रीय प्रचार कार्यालय प्रमुख, आकाशवाणी केंद्रप्रमुख अशी या आयोजनाची जिल्हास्तरीय समिती असून जिल्हा माहिती अधिकारी सदस्य सचिव म्हणून या उपक्रमात कार्यरत आहे.
आजच्या बैठकीत राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने 12 ऑगस्ट 2019 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या करिता तयार केलेल्या अमृतमहोत्सवी भारत उपक्रमाचे सादरीकरण सादर करण्यात आले. या सादरीकरणामध्ये प्रत्येक विभागाचे कर्तव्य निश्चित करण्यात आले असून त्यासाठी प्रत्येकाने व्यक्तिगत दायित्व म्हणून सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील व्यापार-उद्योग स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्या ,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यासोबतच शालेय शिक्षण, सामाजिक न्याय विभाग, यांच्यामार्फत घराघरात स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी निमित्त आयोजित प्रत्येक कार्यक्रम गेले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात स्वातंत्र्याची निगडीत अज्ञात नायकांच्या जन्मस्थळाची, कार्यस्थळाची माहिती जिल्ह्यात जावी, स्वातंत्र्य लढ्यात आपल्या जिल्ह्याचा सहभाग कळावा, यासाठी प्रत्येक विभागाने जागरूक राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आज झालेल्या बैठकीला प्रामुख्याने यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, राष्ट्रीय सेवा योजनेचे राजू बुरोले, पोलीस निरीक्षक आर. डी निकम, उपशिक्षणाधिकारी सुजाता आगरकर, क्रीडा अधिकारी माया दुबळे, आकाशवाणीच्या कार्यक्रम प्रमुख सुनालीनी शर्मा यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.