*दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन*

*दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन*

· यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही
· कोरोना अधिक असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना प्रवेश नाही
· दोन डोस घेतलेल्यांनाच तपासणी अंती प्रवेश
· 65 वर्षावरील ज्येष्ठांना, 10 वर्षाखालील बालकांना प्रवेश नाही
· आजारी व्यक्ती, गरोदर महिलांनी न येण्याचे आवाहन
· दीक्षाभूमी परिसरात मुक्काम करण्यास मज्जाव
· खाद्यान्न वाटप स्टॉल, मोफत अन्नदान प्रतिबंधीत
· ओळखपत्राशिवाय कोणालाच परवानगी नाही
· पुस्तक, मुर्त्यांचे स्टॉल लावले जाणार नाही
· जिल्ह्याच्या सीमा, रेल्वे स्थानक, बसस्थानकांवर तपासणी
· लक्षणे असणाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी,

नागपूर दि. 7 : राज्य शासनाच्या सूचनेनुसार यावर्षी दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा होणार नाही. तथापि, या ठिकाणी काही अनुयायी आल्यास कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाईल. दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे व्यापक आरोग्य हित लक्षात घेऊन भाविकांनी यावर्षी दीक्षाभूमीवरील गर्दी टाळावी, असे आवाहन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज या संदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने 2 ऑक्टोबर रोजी यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यानंतरही अनेक अनुयायी दीक्षाभूमीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरात कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच सोयी-सुविधा करण्यात याव्यात, या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी विमला आर., महानगर आयुक्त राधाकृष्णन बी, परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, ट्रस्टी विलास गजघाटे, अतिरिक्त विभागीय पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, नागपूर ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, उपायुक्त आशा पठाण, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीमध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये नागपूरला यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होणार नाही, याबाबतची माहिती देण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. केवळ दीक्षाभूमीची नव्हे तर विभागात कोणत्याही ठिकाणी अन्य धार्मिक कार्यक्रमासाठी अधिक गर्दी होत असल्यास कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

दीक्षाभूमी येथील कार्यक्रमाच्या संदर्भात कोविड-19 दिशानिर्देश पाळताना राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे या ठिकाणी 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच दहा वर्षाखालील मुलांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात यावे, आजारी व्यक्ती, गरोदर महिला यांना प्रवेश देण्यात येऊ नये, तसेच प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग व्हावे, लक्षणे असल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी, प्रत्येकाला सॅनीटायझर मिळावे, मास्क शिवाय प्रवेश देऊ नये, रेल्वे स्थानक, बस स्टॅड, जिल्हयांच्या सिमांवर तपासणी व्हावी, सोशल डिस्टन्सिग पाळण्यात यावे, यासाठी आवश्यक बॅरेकेटींग, आरोग्य पथक, पोलीस व महानगरपालिका कर्मचारी यांची योग्य ठिकाणी तैनाती करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावर्षी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सावटात हा सोहळा आल्याने गर्दीवर प्रतिबंध करण्यासाठी काही निर्णय शासनाला घ्यावे लागत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी प्रशासनाची ही भूमिका समजून घ्यावी. यावर्षी घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दरवर्षी दीक्षाभूमीवर या निमित्ताने मोठ्या प्रमाणात अन्नछत्र उघडले जाते. विविध सामाजिक संघटनांकडून खानपानाची व्यवस्था केली जाते. मात्र यावर्षी दीक्षाभूमीवर आत मध्ये कोणालाही मुक्काम करता येणार नाही. दीक्षाभूमी परिसरात कुठेही थांबता येणार नाही. तसेच आजुबाजुच्या परिसरातही मुक्काम करता येणार नाही. या ठिकाणी कोणतेही फूड स्टॉल, पुस्तकांची दुकाने, मूर्त्यांची दुकाने लावता येणार नाही. तसेच महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये अधिक कोरोना रुग्ण आहेत त्या जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी येण्यास प्रतिबंधित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून व महाराष्ट्रातल्या उर्वरित जिल्ह्यांमधून येणाऱ्या भाविकांनी, अनुयायांनी यावर्षी नागपूरला दसरा मेळाव्यात येण्याचे टाळावे असेही त्यांनी आवाहन केले आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …