*उदयसिंह उर्फ गज्जू यादव यांच्या प्रयत्नामुळे अजय कोकोडेचे टळले जीवघेणे संकट*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
पारशिवनी – पारशिवनी तालुक्यातील कोलीतमारा येथील २६ वर्षीय अपघात ग्रस्त अजय कोकोडे याला लोकनेता व संवेदनशील व्यक्तिमत्त्व उदयसिंह उर्फ गज्जू यादव यांनी माणुसकीचा हात दिल्यामुळे आशा हॉस्पिटल कामठी येथे त्याच्या उजव्या पायावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे अजयच्या जीवावर बेतणारे संकट टळले.
प्राप्त माहितीनुसार अजय हा उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून त्याची तालुक्यात ओळख आहे. मागील १३ सप्टेंबरला भागिमाहिरी शिवारात एका दुचाकी स्वाराने धडक दिल्यामुळे त्याच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड तुटून तीन तुकडे झाले व पायला गंभीर दुखापत झाली. अजयचे वडील हिरामण हे अपंग असून आई मन्नूबाई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. घरचा करतासवरता अजय बिछान्यावर पडल्याने कुटुंबाचे अर्थचक्र बिघडले. आर्थिक परिस्थिती फार कमकुवत असल्यामुळे गावठी इलाज केले पण काहीही फायदा झाला नाही. आर्थिक दुर्बलतेमुळे अजय घरीच पडून होता. दिवसेंदिवस त्याच्या पायावर सुजन वाढून असह्य वेदना भोगत होता. अश्यातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक नेते गावात येऊ लागले. मोठमोठे आश्वासनं देऊ लागले मात्र अजयच्या हाती निराशाच आली. याच काळात उदयसिंह उर्फ यादव हे कोलीतमारा येथे प्रचारासाठी गेले असता राजू कोडवते आणि गावकऱ्यांनी अजयच्या मदतीची मागणी केली. उदयसिंह यादव यांनी त्यांना मदतीचा शब्द दिला आणि निवडणूक संपताच आशा हॉस्पिटल कामठी येथे अजयला भरती करून घेतले. दिनांक ९ ऑक्टोबरला २०२१ रोजी अजयच्या पायावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रिये दरम्यान त्याला रक्ताची गरज असताना श्री गज्जू यादव यांनी आकाशझेप फाऊंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान तर्फे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांच्या मदतीने ABrh+ve रक्तगटाचे दोन युनिट हेडगेवार रक्तपेढी नागपूर येथून विकत घेऊन अजयला निःशुल्क पुरविण्यात आले.
या कार्यासाठी कोलितमारा येथील राजू कोडवते, पालासावळीचे सरपंच राजेंद्र ठाकूर, विट्ठल पाटिल माजी उपसरपंच कोलितमारा,रामचरण करनाके माजी पंचायत समिति सदस्य, भोजराज परतेती माजी उपसरपंच,आकाशझेपचे सदस्य सुरेंद्र सांगोडे यांनी मोलाची भूमिका बजावली.