*खापरखेडा वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन तात्पुरते स्थगित*
*मुख्य अभियंता यांना सहाय्यक कामगार आयुक्तांचे पत्र*
नागपुर उपजिल्हाप्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर:- स्थानिक औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना वेळेवर मासिक वेतन मिळत नसल्यामुळे २० डिसेंबर रोजी पॉवर फ्रंट कंत्राटी कामगार संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलनाच हत्यार उपसले होते, मात्र सहाय्यक कामगार आयुक्तांनी मुख्य अभियंता यांना दिलेल्या पत्रात कंत्राटी कामगारांना विहित कालावधीत मासिक वेतन देण्याच्या सूचना केल्या शिवाय मुख्य अभियंता राजू घुगे व संबंधित अधिकारी, खापरखेडा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप बनसोड व सर्व वार्षिक कंत्राटदार तसेच कंत्राटी कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांच्या सोबत सर्व्हिस बिल्डींग कॉन्फरन्स हॉल मध्ये संयुक्त झालेल्या बैठकी दरम्यान वेळेवर मासिक वेतन देण्याचे आश्वासन दिल्यामुळे बेमुदत कामबंद आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.
किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गतच्या नियम २१ (ए) (बी) अंतर्गतच्या तरतुदीनुसार कामगारांचे वेतन महिना संपल्यावर १० तारखेच्या आत करणे बंधनकारक असून वेतन अधिनियम, १९३६ कलम ५(१) अंतर्गतच्या तरतूदीनुसार विहित कालावधीत वेतन प्रदान करणे बंधनकारक आहे मात्र असे असतांनाही खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत कंत्राटी कामगारांना कंत्राटदारांकडून वेळेवर मासिक वेतन देण्यात येत नाही, त्यामुळे मुख्य मालक म्हणून स्थानिक औष्णिक वीज केंद्र प्रशासनाने मासिक वेतन अदा करावे अशी आग्रही भूमिका पॉवर फ्रंट कंत्राटी कामगार संघटनेने घेतली. यासंदर्भात मुख्य अभियंत्याकडे अनेकदा पाठपुरावा केला, मात्र न्याय मिळत नसल्याचे पाहून अखेर २० डिसेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात मुख्य अभियंत्यासह सहाय्यक कामगार आयुक्त व ईतर संबंधित विभागाला पत्राद्वारे निवेदन देऊन कळविण्यात आले. पत्राच्या अनुषंगाने सहाय्यक कामगार आयुक्तांनी संघटनेने दिलेल्या पत्राची दखल घेत दिनांक १७ डिसेंबर रोजी सहाय्यक कामगार आयुक्त नि. वा.नगरारे यांनी वीज केंद्राचे मुख्य अभियंता यांना दिलेल्या पत्रात कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम, १९७० अंतर्गतच्या तरतूदीनुसार एखादा कंत्राटदार कामगारांचे वेतन विहित कालावधीत प्रदान करीत नसल्यास उचित अधिनियमाच्या कलम २१(४) अंतर्गतच्या तरतूदीनुसार मुख्य मालकाने कंत्राटदारांच्या देय असलेल्या रकमेतून वसूल करून कामगारांचे वेतन कामगारांना देण्याबाबतची तरतूद असल्याचे म्हटले, शिवाय मुख्य मालक या नात्याने कामगारांची देणी त्यांना अदा होतील याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार व मुख्य अभियंत्यांची असल्याचे कळविण्यात आले. यासंदर्भात मुख्य अभियंता यांनी पॉवर फ्रंट कंत्राटी कामगार संघटना व कंत्राटदार संघटनेच्या सामूहिक बैठकीचे आयोजन १७ डिसेंबरला केले होते. यावेळी कंत्राटी कामगारांच्या मासिक देयका संबंधी मुख्य कार्यालयाशी पाठपुरावा करण्यात येत आहे तसेच दर महिन्याच्या ७ व १० तारखेला कंत्राटी कामगारांचे मासिक वेतन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन मुख्य अभियंता व कंत्राटदार संघटनेने दिले. त्यामुळे तूर्तास बेमुदत कामबंद आंदोलन मागे घेण्याची घोषणा पॉवर फ्रंट संघटनेचे खापरखेडा शाखेचे अध्यक्ष भुपेंद्र चतुर्वेदी, रोशन गोस्वामी,मनिष भोंदेकर, मुकेश ढोले यांनी केली. मात्र वेळेवर मासिक वेतन न झाल्यास पूर्व सूचना न देता बेमूदत कामबंद आंदोलन करण्यात येईल असा सूचक ईशाराही त्यांनी दिला.