*झुडपी जंगलाबाबत केंद्र शासनास तातडीने प्रस्ताव सादर करा
– सुनील केदार*
*गिरड दर्गा रस्ता रंदीकरणाबाबत आढावा*
नागपूर: पर्यटनाच्या दृष्टीने गिरड दर्गा परिसर महत्वाचा आहे. या दर्गाकडे गिरडपासून जाणाऱ्या रस्त्याच्या रूंदीकरणात झुडपी जंगल येत असल्याने त्याबाबत स्वयंपूर्ण प्रस्ताव वनविभागाला तातडीने सादर करावा. केंद्र सरकारकडे त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
गिरड ते गिरड दर्गापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणाच्या प्रस्तावाबाबत विशेष आढावा बैठकीचे आयोजन दि. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर महानगर प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, वर्ध्याचे उपवन संरक्षक श्री.शेपट, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्री. पेंदे, आर्किटेक्चर भिवगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता शुभम गुंडतवार, गिरड दर्गाचे श्री. काजी, सरपंच श्री.नौकरकर यावेळी उपस्थित होते.
गिरड येथील सामाजिक सभागृहाच्या कामात वनविभागाची जागा येत असल्याने त्याबाबत चर्चा करुन तत्काळ बांधकामाच्या कामास गती द्यावी. गिरड हे पर्यटन क्षेत्र असून लाखो श्रध्दाळू येथे येतात. पर्यटक व भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही श्री. केदार यांनी सांगितले. वनहक्काबाबत असलेल्या या प्रस्तावास वन विभागाला सोयिस्कर होणार असे मुद्दे त्यात नमूद करा. जमीनीची धूप होणार नाही याबाबत रस्ता रुंदीकरणात रस्त्याच्या कडेला निंब वृक्षाची लागवड करा. पर्यावरण रक्षणासाठी रस्ता रंदीकरण करतांना उपाययोजना म्हणून या परिसरातील वृक्षांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी वन विभागाकडे सोपवावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस वन, सार्वजनिक बांधकाम विभाग, गिरड दर्ग्याचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.