**सावनेर येथे जिनिंग प्रेसिंग व कापूस खरेदी चे शुभारंभ**
*मुहूर्तावर 3 हजार क्विंटल कापूस खरेदी*
सहकारक्षेत्र बाजारपेठेच्या स्पर्धेसाठी तयार- *सुनील केदार*
*बाबासाहेब केदार जिनिंग प्रेसिंग यांच्याकडून प्रक्रिया केलेला एक लाख क्विंटल कापूस खरेदी करणार आहे. त्यामुळे खरेदीची स्पर्धा निर्माण होऊन खाजगी व्यापारी शेतकऱ्यांच्या कापसाचा भाव पाडणार नाहीत*
मुख्य संपादक- किशोर ढूंढेले
सावनेर प्रतिनिधि- सूरज सेलकर
सावनेर– शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या सहकारी संस्थांना स्पर्धेच्या युगात बाजारातील स्पर्धेला तोंड देण्याची गरज आहे. बाबासाहेब केदार जिनिंग प्रेसिंग संस्था ही शेतकऱ्याचे हित जपणारी संस्था आहे, म्हणूनच सावनेर येथे आधुनिक कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. सहकारक्षेत्र बाजारपेठेतील स्पर्धेसाठी तयार झाले आहे, असे प्रतिपादन सावनेरचे आमदार सुनील केदार यांनी केले.
* सावनेर येथे बाबासाहेब केदार जिनिंग प्रेसिंग संस्थेच्यावतीने आयोजित अत्याआधुनिक कारखान्याचे उद्घाटन व कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करताना ते अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी नागपूर जिल्हा सहकारी सूतगिरणी पाटणसावंगी येथील उपाध्यक्ष सुधाकर धोटे, कार्यकारी संचालक बिपिन शर्मा, बाजार समितीचे सभापती गुणवंतराव चौधरी, कळमेश्वर बाजार समितीचे उपाध्यक्ष बाबाराव पाटील, दिलीप बनशिंगे, पंकज चिंचमलातपुरे, कळमेश्वर खविसंचे बाबाराव कोढे, विनोद जैन, मनोज बसवार, बब्बू महाजन, सुनील चापेकर, वैद्यनाथ डोंगरे, सतीश लेकुरवाळे उपस्थित होते.
कापसावर प्रक्रिया करून गाठींची निर्मिती
बाबासाहेब केदार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आमदार केदार यांच्या हस्ते कापसावर प्रक्रिया करून गाठींची निर्मिती करणाऱ्या या आधुनिक कारखान्याचे उद्घाटन व कापूस खरेदी करण्याचा शुभारंभ केला. संचालन नरेंद्र माहूरतळे यांनी केले तर सुरज डफरे यांनी आभार मानले. आयोजनासाठी अबूजी महाजन, बबन भड, ज्ञानदेव आमगावकर, मधुकर निमजे, अविनाश देशमुख ,वैभव मखे, काशिनाथ काकडे ,मधु पाटील, दाते ,खोरगडे आदींनी सहकार्य केले
पहिल्याच दिवशी तीन हजार क्विंटल
कापूस खरेदी सुरू करताच कपाशीने भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या दुपारपासून रात्री आठ नऊ वाजेपर्यंत पहिल्या दिवसाला तीन हजार क्विंटलची खरेदी झाली. जिनिंग-प्रेसिंगद्वारे कापसाला 5 हजार 51 प्रतिक्विंटल भाव देण्यात येत आहे. यामुळे या केंद्रावर कापूस विक्रीसाठी मोठ्या संख्यने शेतकरी येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सूतगिरणीला हवा एक लाख क्विंटल कापूस
नागपूर जिल्हा कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी सूतगिरणी पाटणसावंगी यंदा बाबासाहेब केदार जिनिंग प्रेसिंग यांच्याकडून प्रक्रिया केलेला एक लाख क्विंटल कापूस खरेदी करणार आहे. त्यामुळे खरेदीची स्पर्धा निर्माण होऊन खाजगी व्यापारी शेतकऱ्यांच्या कापसाचा भाव पाडणार नाहीत.