*शेती पूरक जोडधंदाच ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करेल – ना. सुनील केदार*
नागपूर दि.२३: अन्नधान्य, दूध व कुकुटपालन गोटफार्मिंग अशा शेती पूरक व्यवसायांची माणसाला कायम गरज भासणार आहे. माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टींची निर्मिती शेतकऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे शेतीवर आधारित जोडधंधाच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला भरारी देणार असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा वार्षिक योजना२०२०-२१ अंतर्गत सर्वसाधारण व आदिवासी लाभार्थी करिता कुक्कुट व कुक्कुट पक्षीगृह वाटप लोकार्पण सोहळा सावनेर तालुक्यातील बडेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सुनील केदार बोलत होते.
या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, जिल्हा परिषद सदस्य छाया बनसिंगे, नीलिमा उईके, ज्योती शिरस्कर, पशुसंवर्धन विभागाचे अरविंद ठाकरे, पशुसंवर्धन आयुक्त पुंडलिक, तहसीलदार, गटविकास अधिकारी व मोठ्या प्रमाणात लाभार्थी नागरिक उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत २५ कोंबडी व ३ कोंबडे हे देशी वाणाचे मिळणार आहे. हे कुक्कुट विशेषतः अंडी उबवनी करिता उपयुक्त राहील.आपल्या वक्तव्यात मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की, हा नाविन्यपूर्ण आणि प्रायोगिक तत्वावर सावनेर,कळमेश्वर व मौदा तालुक्यातील गावांमध्ये राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. या कुक्कुट व्यवसायामुळे लाभार्थ्यांना दरवर्षी सरासरी ऐंशी हजार रूपायापर्यंत उत्पन्न मिळेल. या योजने व्यतिरिक्त जिल्हा परिषदेतर्फे अनुसूचित जाती,जमातीतील लाभार्थ्यांकरिता मागेल त्याला गाई व मागेल त्याला शेळ्या हा कालबद्ध कार्यक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता या योजने करिता ३० कोटी रुपयांचा निधी खनिज निधीमधून मंजूर करण्यात आल्याचेही मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
महात्मा गांधीजी यांनी सांगितल्या प्रमाणे गाव बनाव- देश बनाव या उक्ती प्रमाणे कार्य करून ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकरी वर्गाचे जीवनमान उंचविण्यास मी राज्याचा मंत्री म्हणून सदैव कटिबद्ध राहील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ही योजना पथदर्शी प्रकल्प असून या योजनेच्या यशस्वीतेवर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये देखील या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी आश्वासित केले.