*अवैध पार्किंग वर कारवाई करण्याची मागणी*
*माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोणेकर यांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन*
*१५ महिन्यात १९ मृत्यु तर ३७ जख्मी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्गा क्रमांक १४४ वरील कन्हान पोलीस स्टेशन कार्यालय ते टेकाडी बसस्थानक हा वर्दळीचा मुख्य रस्ता शहराच्या मधोमध आहे. या रस्त्यावर १५ महिन्यांत १९ लोकांना जीव गमवावा लागला, तर ३७ नागरिक जख्मी झाले. त्यामुळे हा रस्ता अपघातप्रवण स्थळ झाला आहे. याला कारण आहे अवैध पार्किंगचे .
शहरातील मुख्य मार्गावरील अवैध वाहन पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली असून बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर पोलिस यंत्रणेने कारवाई करावी,
अशी मागणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी केली असून त्यांनी नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक विजय कुमार मगर यांना शांतता समिती बैठकीच्या सभेत निवेदन सादर केले आहे .
याच रस्त्यालगत अनेक ठिकाणी नागरिक बिनधास्त वाहन पार्क करतात . यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. शिवाय बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने व दुकाने याच मार्गावर असून, पार्किंगची सुविधा अपुरी असल्याने ग्राहकांची वाहने रस्त्यावरच पार्क केली असतात. तसेच या मार्गावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार्यालय असल्याने बँकेत व्यवहारासाठी आजूबाजूच्या खेड्यातून नागरिक मोठ्या संख्येने कन्हान येथे येतात. बँकेसमोर पार्किंगची व्यवस्था नसल्याने अनेक जण आपली वाहने रस्त्यावरच पार्क करतात. त्यामुळे नुकतेच एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाला. आणखी भविष्यात किती बळी या रस्त्यावर एका होईल, याचीच स्थानिक प्रशासन वाट पाहत आहे .