कसनसूर दलमच्या कमांडरसह तेथील सहा नक्षल सदस्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले
त्यात ५ महिला नक्षलींचा समावेश आहे
गढ़चिरोली जिल्हा प्रतिनिधि – सूरज कुकड़वार
गडचिरोली- कसनसूर दलमच्या कमांडरसह तेथील सहा नक्षल सदस्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यात ५ महिला नक्षलींचा समावेश आहे. या सर्वांवर सुमारे ३१ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस होते.
संदीप उर्फ महारु चमरू वड्डे(कमांडर)(३०), मनिषा उर्फ बाली उर्फ गंगाबाई जगनुराम कुरचामी(३०), स्वरुपा उर्फ संथिला उर्फ सरिता सुकलू आतला(२३), अग्नी उर्फ निला मोतीराम तुलावी(२५), ममिता उर्फ ममता जन्ना राजू पल्लो(२०) व तुलसी उर्फ मासे सन्नू कोरामी(२४) अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांची नावे आहेत.
नक्षल्यांच्या हिंसाचाराला कंटाळल्याने आणि राज्य् शासन आत्मसमर्पित नक्षल्यांचे पुनर्वसन करीत असल्याचे बघून या सहा नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. अख्खे दलम सदस्य आत्मसमर्पण करण्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी चातगाव दलमच्या सदस्यांनी आपल्या कमांडरसह शरणागती पत्करली होती. जानेवारी २०१९ पासून आतापर्यंम २९ नक्षली आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात आले आहेत, तर २१ नक्षल्यांना अटक करण्यात आली आहे. दंडकारण्य स्पेशल झोनची सदस्य नर्मदाक्का व तिचा पती किरणकुमार यांना जून महिन्यात अटक करण्यात आली होती. यासंदर्भात गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे व पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शासन आत्मसर्पण करणाऱ्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या काही दिवसांत मोठे कॅडर आत्मसमर्पण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, श्री.बन्सल उपस्थित होते.