गोंडवाना विद्यापीठात १७ व्या आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य-२०१९’ चे आयोजन करण्यात आले
गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर
गडचिरोली,ता.29: येथील गोंडवाना विद्यापीठात १७ व्या आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य-२०१९’ चे आयोजन करण्यात आले असून, २ डिसेंबरला विद्यापीठाचे कुलपती तथा महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
डॉ.कल्याणकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने ‘इंद्रधनुष्य-२०१९’ च्या आयोजनाची जबाबदारी राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाने गोंडवाना विद्यापीठाकडे सोपवली आहे. २ ते ६ डिसेंबर या कालावधीत राज्यातील २० विद्यापीठांमधील तरुणाई आपल्या कलेचे सप्तरंग विद्यापीठाच्या प्रांगणात उधळणार आहे. संगीत, नाटक, साहित्य, नृत्य व ललित कला या पाच प्रकारांतील २६ कलांचे सादरीकरण या महोत्सवात होणार आहे. त्यासाठी ४० जणांची चमू १ डिसेंबरला गडचिरोलीत दाखल होणार आहे.
२ डिसेंबरला सकाळी ११ वाजता महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर व प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी उपस्थित राहतील. ६ डिसेंबरला सकाळी ११ वाजता समारोपीय कार्यक्रम होणार असून, सिने कलावंत मकरंद अनासपुरे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील, असे डॉ.कल्याणकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, प्रा.डॉ. शशीकांत गेडाम, प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, प्रा.डॉ.धनराज खानोरकर, डॉ.प्रिया गेडाम, डॉ.विनायक शिंदे, डॉ.प्रीती पाटील, डॉ.दुबे उपस्थित होते.