पत्रकार एस.एम.देशमुख म्हणजे झपाटलेलं झाडः भारतकुमार राऊत
पुणे दि.3 ( प्रतिनिधी ) पत्रकार एस.एम.देशमुख म्हणजे झपाटलेले झाडं आहे.पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी आणि समाजाच्या हितासाठी त्यांनी चळवळी उभ्या केल्या आणि पंधरा पंधरा वर्षे प्रश्नांचा पाठपुरावा करून प्रश्न तडीस नेले.हाती घेतलेल्या कामाचा यश मिळेपर्यंत झपाटल्यासारखा पाठपुरावा करण्याचा एसेम यांचा स्वभाव असल्याने त्यांनी हाती घेतलेले सर्व प्रश्न मार्गी लावल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रातील पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळवून दिल्याबद्दल एस.एम.देशमुख यांचा पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने भारतकुमार राऊत आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते एक लाखाची थैली,मानपत्र,स्मृतीचिन्ह,पुणेरी पगडी घालून सन्मान करण्यात आला.यावेळी किरण नाईक यांनाही सन्मानित करण्यात आलं.त्यावेळी भारतकुमार राऊत बोलत होते.
ते पुढे म्हणाले,एस.एम.देशमुख यांनी केवळ पत्रकारांच्या प्रश्नांसाठीच लढे उभारले असं नाही तर जनसामांन्यांच्या प्रश्नांसाठी देखील त्यांनी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली.कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी त्यांनी सातत्यानं सहा वर्षे संघर्ष केला,तो विषय मार्गी लावला,सेझ विरोधी लढयातही देशमुखांचा सहभाग होता.कोकणातील स्थानिक भुमीपुत्रांच्या हक्कासाठी अनेकदा देशमुख रस्त्यावर उतरले..खरं तर पत्रकारांचं हे काम नसलं तरी सभोवतालचे प्रश्न पाहून अस्वस्थ होणार्या देशमुख यांनी सामाजिक जाणिवा जपत हे प्रश्न हाताळले.त्यामुळं आम्ही त्यांना ‘कार्यकर्ता पत्रकार’ म्हणतो.अशा एका चळवळ्या पत्रकाराचा सन्मान पुण्यनगरीत होतोय याचा आनंद आणि अभिमान आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाला त्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजेत असंही भारतकुमार राऊत म्हणाले.यावेळी त्यांनी किरण नाईक यांच्या कार्याचाही गौरवपूर्ण उल्लेख केला..
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुमार सप्तर्षी यांनी देखील देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला.एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांचे प्रश्न हाती घेऊन सरकारला कायदे करायला भाग पाडले हे नक्कीच कौतूकास्पद आहे.आज पत्रकारितेबद्दल अनेक पध्दतीनं बोलले जात असताना देखील एस.एम.देशमुख यांच्यासारखे पत्रकार यशस्वी कसे होऊ शकतात याबद्दल मला आश्चर्य वाटते.देशमुख हे ध्येयवेडे पत्रकार असून सामाजिक कामं करणारा पत्रकार घडविण्याचे देशमुख याचं ध्येय मला कौतूकास्पद वाटते असे मत त्यांनी व्यक्त केलं.पत्रकाराच्या धर्माचं नाव ‘नेशन बिल्डिंग’ असं आहे.देशमुख हा धर्म प्रामाणिकपणे निभावत असल्याचे दिसते असे मतही कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.अनेक अडथळ्यांवर मात करीत देशमुख यांनी निर्धारानं आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल केली आणि अंतिमतः आपले ध्येय साध्य केल्याबद्दल त्यांनी देशमुख यांना धन्यवाद दिले.
सत्काराला उत्तर देताना एस.एम.देशमुख यांनी चळवळीतील आपले अनुभव सांंगितले.चढ-उतार सांगितले.मात्र निर्धार पक्का होता आणि कार्यकर्त्याला निराश होता येत नसल्यानं निराश न होता लढाई पुढं नेली आणि राज्यातील पत्रकारांच्या बळावर यश मिळविल्याचे स्पष्ट केले.पत्रकार संरक्षण कायद्याची लढाई अंत पाहणारी होती मात्र पत्रकारांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर ती जिंकता आल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांनी सामााजिक जबाबदारीचं भान ठेऊन काम करावं,केवळ घडलेल्या बातम्याचे वृत्तांत देणं एवढंच पत्रकारांचं काम नाही तर लोकांचे प्रश्न,त्यांच्यावर होणारे अन्याय,अत्याचार याविरोधात आवाज उठविणे आणि प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिका देखील पत्रकारांनी पार पाडली पाहिजे.याच भूमिकेतून कोकणातील पत्रकारांनी मुंबई-गोवा महार्माााच्या चौपदरीकरणाचा विषय हाती घेतला,त्याचा सहा वर्षे पाठपुरावा केला आणि अखेरीस तो तडीस नेला.हा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेऊनच मराठी पत्रकार परिषद आणि परिषदेशी संलग्न जिल्हा आणि तालुका संघ कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली.
चळवळीतील कार्यकर्त्याला अनेक कडू-गोड प्रसंगांना सामोरं जावं लागतं,अनेकदा आर्थिक स्थितीची सामना करावा लागतो.मात्र कार्यकर्ता असो किंवा पत्रकार त्यांनी जर आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या तर त्याला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही तो स्वाभिमानानं आणि निर्भयपणे जगू शकतो.मी याच भूमिकेतून काम केल्यानं मला कोणासमोर हात पसरण्याची वेळ आली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.पत्रकारितेतील नवीन संधी संपलेल्या आहेत,गेल्या अऩेक वर्षात एकही नवे दैनिक किंवा नवे चॅनल सुरू झाले नाही.उलट आहे तीच दैनिकं बंद पडत आहेत.नव्या तंत्रज्ञानामुळं माणसाची गरज कमी होत असल्यानं या संकटाशी कसा सामना करायचा याचा विचार पुढील काळात करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अरूण खोरे,निशिकांत भालेराव,देवेंद्र भुजबळ,आदिंची भाषणं झालं.किरण नाईक यांनीही सत्काराला उत्तर दिले.पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे यांनी प्रास्ताविक केले तर परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी आभार मानले.यावेळी परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस संजीव जोशी,कोषाध्यक्ष विजय जोशी,परिषदेच्या मिडिया सेलचे राज्य निमंत्रक अनिल वाघमारे,परिषदेच्या महिला प्रमुख जान्हवी पाटील परिषदेचे अन्य पदाधिकारी विविध जिल्हयातील पदाधिकारी मोठया संख्येनं उपस्थित होते.