हैदराबाद बलात्कार प्रकरण
चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार
विशेष प्रतिनिधि
हैदराबाद- बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला ठार मारण्याचा या चार आरोपींवर आरोप होते. बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
हैदराबादच्या पोलीस आयुक्तांनी या वृत्ताला दुरोरा दिला आहे. तपासादरम्यान या ४ आरोपींना पोलीस घटनास्थळी नेत होते. मात्र, दरम्यानच्या काळात हे चारही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. त्यानंतर पोलिसांनी या चौघांनाही थांबवण्यचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना दाद देत नसल्याचे पाहून शेवटी पोलिसांनी चौघांवर गोळ्या झाडल्या. यात या चौघांचा मृत्यू झाला. आरोपींनी पोलिसांच्या हातातील शस्त्रे खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती तेलंगणचे कायदेमंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली.
4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार
शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ अशी या ४ आरोपींची नावे आहेत. या चौघाना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी त्यांना घटनेची माहिती मिळवण्यासाठी घटनास्थळी नेले. ही घटना नेमकी कशी घडली हे पोलिसांना तपासायचे होते. मात्र, या दरम्यान या चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
तेलंगाणाचे पोलीस महानिरिक्षक जितेंद्र यांनी बीबीसीला ही माहिती दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी कोर्टानं या चारही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती.
हैदराबादपासून 50 किमी अंतरावर असलेल्या चटनपल्ली गावात ही घटना घडली आहे
28 नोव्हेंबर रोजी पशूवैद्यक म्हणून काम करणाऱ्या 27 वर्षीय तरूणीला हैदराबादमध्ये कथितरित्या बलात्कार करून जिवंत जाळण्यात आलं होतं.
अशी घडली होती घटना
मृत तरुणी गच्चीबावली भागामध्ये नोकरीसाठी जात असत. प्रवासासाठी ती स्कूटीचा वापर करत. घटनेच्या दिवशी टोंडुपल्ली टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करून ती टॅक्सीने पुढे गेली. पण ती परतली तेव्हा तिच्या स्कुटीचे टायर पंक्चर झालेले होते. म्हणून मग स्कूटी तिथेच टोल प्लाझाजवळ सोडून टॅक्सीने घरी परतण्याचं तिने ठरवलं.
टोल प्लाझाजवळच्या दोन जणांनी पंक्चर काढतो असे सांगत तिची स्कूटी नेली. मृत तरुणीनं आपल्या बहीण आणि भावाला फोनवरून याबाबत सांगितलं होतं. रस्त्यावर एकटं उभं रहायला भीती वाटतेय, अचानक काही लोक दिसू लागले आहेत आणि एक ट्रक आल्याचंही तिने फोनवर बोलताना सांगितलं होतं.
थोड्या वेळात परत फोन करते असं सांगून तिने बहिणीसोबतच संभाषण संपवलं, पण त्यानंतर फोन बंदच झाला.
मृत तरुणीच्या कुटुंबाने टोल प्लाझाजवळ तिचा शोध घेतला आणि त्यांनतर शमशाबाद पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
त्यानंतर शमशाबाद पोलीसांच्या शादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम सुरू असलेल्या पुलाखाली अर्धवट जळलेला मृतदेह सापडला होता.