हैदराबाद एनकाउंटर – आता माझ्या मुलीच्या आत्मास शांती मिळेल’
विशेष क्राइम रिपोर्टर
हैदराबाद –जवळ पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर सामुहिक बलात्कार करुन तिला निर्दयीपणे जाळून मारण्याच्या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे तेलंगाणा पोलिसांनी एन्काऊंटर केला. पोलिस तपासावेळी हे आरोपी पळून जात असताना त्यांना ठार करण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. यावर पीडित महिला डॉक्टरच्या वडिलांनी प्रतिक्रिया व्यक्त करत पोलिस आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत. ‘‘माझ्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर दहा दिवसांनी पोलिसांनी कारवाई केली. आता माझ्या मुलीच्या आत्मास शांती मिळेल”, असे पीडित महिला डॉक्टरच्या वडिलांनी म्हटले आहे.
आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचे ऐकून समाधानी आहे. विक्रमी वेळेत न्याय मिळाला. ज्यांनी आम्हाला कठीण काळात साथ दिली त्यांना धन्यवाद, असे पीडितेच्या बहिणीने म्हटले आहे.
हैदराबाद जवळील चतनपल्ली गावात २६ वर्षीय डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचे देशात तीव्र पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. या प्रकरणी ४ तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. या चारही आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. ज्या ठिकाणी महिला डॉक्टरला जाळून मारले तेथून जवळच पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर केला.
पोलिसांच्या या कारवाईमुळे मला खूपच आनंद झाला आहे. पोलिसांनी खूपच चांगले काम केले आहे. यानंतर आता ही कारवाई करणाऱ्या पोलिसांवर प्रशासनाने कुठलीही कारवाई करु नये-आशादेवी (निर्भयाची आई)
हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले आहेत. या घटनेनंतर समाजातील सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर दिल्लीतील निर्भया प्रकरणामधील पीडितेच्या आईनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. हैदराबादच्या पीडितेला १० दिवसांत न्याय मिळाला याचा आनंद झाला. तसेच आरोपींचा एन्काऊंटर केल्याबद्दल पोलिसांचे खूप खूप धन्यवाद, असे निर्भयाच्या आई आशादेवी यांनी म्हटले आहे.
आशादेवी म्हणाल्या की, पोलिसांच्या या कारवाईमुळे मला खूपच आनंद झाला आहे. पोलिसांनी खूपच चांगले काम केले आहे. यानंतर आता ही कारवाई करणाऱ्या पोलिसांवर प्रशासनाने कुठलीही कारवाई करु नये, अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
घटनेच्या चार दिवसात पोलिसांकडून आरोपींचा खात्मा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर निर्भयाला न्याय मिळाला अशीच भावना सर्वंजण व्यक्त करत आहेत.