गोंडवाना विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवा सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य-२०१९’ चा समारोप आज प्रसिद्ध सिनेअभिनेते “श्रेयस तळपदे” यांच्या हस्ते झाला
गड़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुडकर
गडचिरोली,: येथील गोंडवाना विद्यापीठात २ डिसेंबरपासून आयोजित राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवा सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य-२०१९’ चा समारोप आज प्रसिद्ध सिनेअभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते झाला. या महोत्सवात मुंबई विद्यापीठाचा संघ विजेता, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ उपविजेता ठरला.
पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात राज्यातील २० विद्यापीठांमधील सुमारे ८०० विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वानी संगीत, नाटक, साहित्य, नृत्य व ललित कला या पाच प्रकारांतील २६ कलांचे सप्तरंग उधळले. त्यानंतर आज अभिनेते श्रेयद तळपदे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, तर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या संचालिका डॉ. प्रिया गेडाम, राजभवनातील निरीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.सुनील पाटील, वित्त प्रबंध समिती अध्यक्ष डॉ. एन डी पाटील, सदस्य ज्ञानोबा मुंडे , डॉ. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, डॉ. विजया पाटील उपस्थित होते. यूथ फेस्टिवल ही फार मोठी बाब असून, त्यामुळे आपला सर्वागिण विकास होतो. तरुणाईने आयुष्याचा एकही क्षण वाया जाऊ देऊ नये, असे श्रेयस तळपदे म्हणाले. गडचिरोलीचे लोक फार प्रेमळ असून असा जिव्हाळा खूप कमी ठिकाणी मिळतो, असेही ते म्हणाले.
या महोत्सवात मुंबईचा सुजेश सुरेश मेनन हा गोल्डन बॉय, तर मुंबईचीच सानिका मलकराज पांचभाई ही गोल्डन गर्ल ठरली. दोघांनाही अभिनेता श्रैयस तळपदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख १० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ललित कला प्रकारात औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विजेतेपद पटकावले, तर साहित्य, संगीत, नाट्य व नृत्य् या चारही प्रकारांत मुंबई विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला. प्रत्येक प्रकारातील विजेत्या संघाला फिरते चषक व प्रमाणपत्र देऊन् सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. नरेंद्र आरेकर तर आभार कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी मानले.