“रिपब्लिकन फोरम” या नव्या संघटनेची स्थापना करीत असल्याची घोषणा

“रिपब्लिकन फोरम” या नव्या संघटनेची स्थापना करीत असल्याची घोषणा

गडचिरोली प्रतिनिधी- सूरज कूकुड़कर

गडचिरोली,ता.9: अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मागील अनेक वर्षे काम करीत असलेले शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडले असून, आपण ‘रिपब्लिकन फोरम’ या नव्या संघटनेची स्थापना करीत असल्याची घोषणा त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

भारिप बहुजन महासंघाचे अनेक वर्षे जिल्हाध्यक्ष राहिलेले रोहिदास राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यातील शेकडो कार्यकर्त्यानी घरची भाकरी खाऊन भारिप बहुजन महासंघ हा पक्ष वाढविला. परंतु ८ नोव्हेंबरला मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा केली. वंचित बहुजन आघाडी या पक्षात बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील ‘रिपब्लिकन’ हे नाव समाविष्ट नाही. त्यामुळे व्यथित होऊन आम्ही पक्ष सोडत असल्याचे रोहिदास राऊत यांनी जाहीर केले.

श्री.राऊत यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीने यंदा लोकसभा व विधानसभा अशा दोन निवडणुका लढल्या. त्यात पक्ष कार्यकर्त्यांनी घरंचंच खाऊन उमेदवारांचं काम केलं. लोकसभा निवडणुकीत पक्षाला ४१ लाख मते मिळाली. परंतु बाळासाहेबांच्या अट्टाहासापोटी लक्ष्मण माने, बॅरि.असदुद्दीन ओवैसी यांच्यासारखे नेते पक्षापासून दूर झाले. परिणामी वंचित आघाडीची मते अर्ध्यावर म्हणजे २४ लाखांवर आली, असे राऊत म्हणाले.

एकेकाळी भारिप बहुजन महासंघाचे तीन-तीन आमदार असायचे. परंतु वंचित आघाडीचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. एकीकडे देश व राज्यातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष भाजपसारख्या धर्मांध व जातीयवादी पक्षाच्या विरोधात एकत्र येऊन निवडणुका लढवीत आहेत; परंतु प्रकाश आंबेडकर मात्र वेगळी भूमिका घेत राहिले. त्याचा फायदा भाजपला झाला, नाहीतर महाराष्ट्रात आज वंचित बहुजन आघाडी सत्तेत असती. वंचितांना सत्ता देण्याच्या नावाखाली त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले, अशी टीका राऊत यांनी केली. आमची यापुढील वाटचाल रिपब्लिकन म्हणूनच राहील व या रिपब्लिकन फोरमची पुढील भूमिका व संरचना लवकरच जाहीर करण्यात येईल, असे राऊत यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला भारिप बहुजन महासंघाचे माजी प्रदेश सचिव कुलपती मेश्राम, माजी जिल्हा सरचिटणीस प्रा.राजन बोरकर, नीता सहारे, ज्योती उंदिरवाडे, वनमाला झाडे, क्रिष्णा चौधरी, अशोक खोब्रागडे, नरेंद्र रायपुरे, हेमंत सहारे, हंसराज उंदिरवाडे, राजू वाकडे, प्रल्हाद रायपुरे, कवडूजी उंदिरवाडे, रमेश बारसागडे, पुण्यवान सोरते, वीणा मेश्राम उपस्थित होते.

सोडून जाणारे लोक हे वंचित आघाडीचे नाहीत: बाळू टेंभुर्णे

भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर नितांत श्रद्धा व विश्वास असून, रोहिदास राऊत यांच्याशिवाय कुणीही पक्ष सोडणार नाही. उलट आगामी काळात पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे, असा विश्वास जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी व्यक्त केला आहे. रोहिदास राऊत यांच्यासोबत पक्ष सोडत असलेले कार्यकर्ते हे पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. तसेच त्यांच्या पत्रकार परिषदेला जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण अशा दोन्ही विभागांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित नव्हते, असेही बाळू टेंभुर्णे यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …