निर्भया : दोषींना फाशी देण्याची तयारी;
एकाला -‘तिहार’मध्ये हलवलं!
देशभर गाजलेल्या निर्भया प्रकरणातील चौघा नराधमांना आता कधीही फासावर लटकवले जाऊ शकते. त्यासाठी तयारी केली जात आहे. यासाठी निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्मा याला दिल्लीतील तिहार तुरुंगात हलवण्यात आले आहे. याआधी तो मंडोळी तुरुंगात होता.
दिल्लीत २०१२ मध्ये झालेल्या निर्भया प्रकरणी चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. अक्षय ठाकूर, मुकेश सिंह आणि पवन गुप्ता हे तिघे दोषी अगोदरपासूनच तिहार तुरुंगात बंद आहेत. आता आणखी एका दोषी विनय शर्माला तिहार तुरुंगात आणण्यात आले आहे.
हैदराबादमधील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि तिच्या हत्येनंतर महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तयारी केली जात आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरण १६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेले होते. तारखेला दोषींना फाशी दिली जाईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. फाशीचे दोरखंड १४ डिसेंबरपर्यंत तयार ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.
दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची दया याचिका याआधीच केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळलेली आहे.
दिल्लीत २३ वर्षीय निर्भयावर सहा नराधमांनी चालत्या बसमध्ये बलात्कार केला आणि तिला मरणासन्न अवस्थेत फेकून दिले होते. २९ डिसेंबर २०१२ रोजी तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता