अमरावतीच्या इज्तेमा वरुन परताणार्या वाहनाला खामगावजवळ अपघात
1 ठार, 12 जखमी
बुलढाना प्रतिनिधि -नंदकिशोर सिरसोले
सोमवारी अमरावती येथे पार पडलेल्या तीन दिवसीय मुस्लिम बांधवांच्या आलमी इज्तेमा वरुन परतत असतांना बुलढाण्या जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला अपघात घडला. या अपघातात एकजण ठार तर बारा जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
अमरावती येथे मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा राज्यस्तरीय आलमी इज्तेमा चा काल सोमवारी सामुहिक दुवा (प्रार्थना) नंतर समारोप झाला. या समारोपानंतर परतीच्या प्रवासात असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांच्या टाटा मॅजीक या वाहनाला अकोला-खामगाव या राष्ट्रीय महामार्गावर खामगाव शहरात नजीक पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने समोरुन जबर धडक दिली.
यामध्ये मो.शकील मो. उमर (42) रा. गौरक्षण रोड, वाडी ता. चिखली या भाविकाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये 12 जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना खामगाव येथे सिल्व्हरसिटी आणि शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी शे.शकील शे. मिया रा. साखरखेर्डा यांनी खामगाव ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम 279, 304 अ, 337, 427 भांदवि सह कलम 134 मोटार वाहन कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस करीत आहे. धार्मिक इज्तेमा वरुन परत असतांना काळाने घाला घातल्याने शेख कुटुंबियांविषयी जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर जागीच ठार झालेले मो.शकील मो. उमर हे ता मॅझिक या वाहनाचे चालक मालक होते.