*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक ; हिरा बा मोदी यांचे निधन*
१०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
म.न्यू.मि
नागपुर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना आजारी पडल्याने त्यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे ३:३० वाजता त्यांचे निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या वर्षी १८ जून रोजी हीराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले होते.
गुरुवारी मध्यरात्री ३ वाजता अचानक हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान हीराबने यांची प्राणज्योत मालवली. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. हीराबेन मोदी यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे.
अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरु होते उपचार
हीराबेन यांची तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदाबादच्या यू.एन. मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.आईची तब्येत बिघडल्याचे कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीने अहमदाबाद येथे दाखल झाले होते. रुग्णालयात सुमारे तासभर थांबले होते. आपल्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. हीराबेन यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे हीराबेन यांची प्रकृती अधिकच खालावली. उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली.
दरम्यान, हीराबेन यांचा जन्म १८ जून १९२३ मध्ये झाला होता. या वर्षी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. आईच्या वाढदिवसासाठी स्वत: नरेंद्र मोदी गुजरातच्या गांधीनगरला आले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते.
आईची तब्येत बिघडल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद येथे रूग्णालयात गेले होते. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: हा ६ वाजण्याच्या सुमारास ट्वीट करत या विषयी माहिती दिली.