*पोलिसांनी आव्हान स्वीकारल्याने नक्षलवाद आटोक्यात: गृहमंत्री एकनाथ शिंदे*
गढ़चिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर
गडचिरोली: नक्षल चळवळीमुळे जिल्हयातील विकासकामांना फार मोठा अडथळा निर्माण झाला होता. परंतु प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा पोलिसांनी आव्हान स्वीकारल्याने नक्षल कारवाया आटोक्यात असल्याचे राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी 22 डिसेंबर 2019 ला गड़चिरोली येथे सांगितले.
जिल्हा पोलिस मुख्यालयात कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहित गर्ग, अजयकुमार बंसल, श्री.सुदर्शन प्रामुख्याने उपस्थित होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, जिल्हयात नक्षल चळवळीत गेलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागरण मेळाव्याव्दारे प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवून त्यांना दैनंदिन जीवनात कोणत्याही बाबींची कमतरता राहणार नाही,याचीही दक्षता घेण्यात येत आहे. युवकांना प्रशिक्षण देण्यापासून तर आर्थिक मदतसुध्दा प्रदान करण्यात येत आहे. यामुळे विकासाच्या मुख्य प्रवाहात युवकांना आणणे आता अडचणीचे ठरणार नाही.
जिल्हयात मोठया प्रकल्पाऐवजी लहान प्रकल्प तयार करुन सिंचनाची सोय करुन देण्याचा शासन विचार करीतआहे. सोबतच शेतमालाला योग्य भाव मिळेल अशा आधारभूत किंमती निश्चित करण्यात येतील. बीआरओच्या धर्तीवर जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते व पुलांची कामे करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करता येईल काय, ते बघू, असे श्री.शिंदे यांनी सांगितले. दळणवळणाबरोबरच उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर आहे. अवघड परिस्थितीत सेवा करणाऱ्या पोलिसांना सर्व सुविधा देण्यासाठी शासन हात आखूड करणार नाही, अशी ग्वाही देताना श्री.शिंदे यांनी आश्रमशाळांच्या अडचणी दूर करुन नागरिकांना वनजमिनीचे पट्टे देण्यासाठी शासन तत्पर राहील, असे सांगितले. आगामी पोलिस भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल, तसेच रोजगार निर्मिती करण्यासाठी उद्योगांना चालना देण्याचे काम शासन करेल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
सुरुवातीला गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन शहीद जवांनाना आदरांजली वाहिली.
*वाळू माफियांवर कठोर कारवाई करणार*
वाळू माफिया अनेक ठिकाणी वाळू चोरी करीत असून, अधिकाऱ्यांशी मुजोरीने वागत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, तसेच वाळू धोरणातही बदल करण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
*ओबीसींच्या प्रश्नावर लवकरच निर्णय*
जिल्ह्यात ओबीसींचे कमी झालेले आरक्षण आणि नोकरभरतीची बिंदुनामावली यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन ओबीसींना न्याय देण्याचे काम शासन करेल, असे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
*गोडलवाही आऊटपोस्टला भेट*
मुख्यालयाच्या भेटीनंतर गृहमंत्र्यांनी गोडलवाही या नक्षलग्रस्त भागातील आऊटपोस्टला भेट दिली. तेथे महाराष्ट्र पोलिसांसह बंदोबस्तावर तैनात असलेल्या सीआरपीएफ आणि एसआरपीच्या जवानांशी त्यांनी संवाद साधला. या जवानांच्या धैर्याचे व त्यागाचे कौतूक करीत गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेमार्फत ऋण व्यक्त केले.