मूर्तीमंत सौजन्याचा…सुखद अनुभव
मलबारहिलवरच्या सहयाद्री अतिथीगृहाचं महत्व राजकीयदृष्टया मंत्रालय किंवा वर्षापेक्षा कमी नाही. महत्वाच्या आणि राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणार्या घटना सहयाद्रीवरच घडत असतात.अनेक महत्वाच्या बैठका सहयाद्रीनं पाहिल्यात आणि वादावादीच्या घटनांचा देखील सहयाद्री साक्षीदार आहे.अनेक प्रश्नांची सोडवणूक येथेच झाल्याचे सहयाद्रीनं पाहिलेलं आहे.मंत्रालयात सामांन्य नागरिकही येत असतात.सहयाद्रीवर मात्र केवळ व्हीआयपींचाच राबता असतो.शिष्टमंंडळं वगैरे घेऊन मंडळी जरूर सह्याद्रीवर येते पण सहयाद्री ओळखतो ते नेते मंडळी आणि वरिष्ठ अधिकार्यांनाच..आम्ही देखील कॉग्रेसच्या काळात अनेकदा पत्रकाराचीं शिष्टमंडळं घेऊन सहयाद्रीवर गेलेलो आहोत. मधली पाच वर्षे मात्र सहयाद्रीची दारं आमच्यासाठी बंद होती.त्यामुळं तिकडं पाच वर्षात कधी फिरकलोच नाही.कालचक्र बदलंलं आणि पुन्हा एकदा सहयाद्रीचे दरवाजे आम्हाला खुले झाले..काल जेव्हा सहयाद्रीवर पोहोचलो तेव्हा अनेकवेळच्या आठवणी ताज्या झाल्या.त्या त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांशी झालेला संवाद,ताणाताणीच्या घटनाही नजरेसमोर उभ्या राहिल्या..
आम्ही सहयाद्रीवर पोहोचलो तेव्हा मुख्यमंत्र्यांची शिर्डीच्या शिष्टमंडळाशी चर्चा सुरू होती.वाटलं आता दोन-चार तास आपल्याला प्रतिक्षा करावी लागणार.मात्र अर्ध्या तासातच विषय संपला..त्यानंतरच्या दोन घटना मुख्यमंत्र्यांच्या प्रती आदर वाढविणार्या होत्या..मुख्यमंत्री स्वतःशिष्टमंडळासोबत बाहेर पडले आणि त्यांना निरोप देण्यासाठी सहयाद्री अतिथीगृहाच्या पायर्यांपर्यंत गेले.राज्याचा प्रमुख एवढया आपलेपणानं आलेल्या मंडळींचं आदरातिथ्य करतोय.. प्रोटोकॉलची पर्वा न करता रयतेसाठी चार पायर्या उतरतोय हे दृश्य यापुर्वी आम्ही कधी पाहिलं नव्हतं..
क्षणभर वाटलं..मुख्यमंत्री निघाले आज भेट होत नाही.मात्र मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरूध्द अष्टपुत्रे यांनी ‘एस.एम.देशमुख आपल्याला भेटायला आले आहेत’ असं त्यांना सांगितल्यानंतर ‘त्यांना बसायला सांगा मी येतो’..असं सांगून ते शिर्डीच्या शिष्टमंडळाला निरोप देण्यासाठी गेले .निरोप देऊन आपल्या दालनात आले आणि आम्हाला लगेच बोलावणं आलं.मी किरण नाईक,आमचे अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार मित्र मंदार पारकर आत गेलो.आत गेल्या गेल्या मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू लागलो तर उध्दवजी म्हणाले,’देशमुख अगोदर बसा आणि काय काम घेऊन आलात ते सांगा’.आम्ही आमचे विषय मांडले आणि त्यांनी लगेच उपस्थित अधिकार्यांना त्यासंबंधीच्या सूचना दिल्या.हा अनुभव आम्हाला नवा होता.बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचं काम निधी रखडल्यानं अर्धवट अवस्थेत आहे हे जेव्हा त्यांच्या नजरेस आणून दिलं तेव्हा जे काम झालंय त्याचे फोटो मला द्या असं त्यांनी सूचविलं.आमचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी त्यांना फोटो दाखविताच त्यांनी दोन कोटींचा उर्वरित निधी तात्काळ वर्ग कऱण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या.इतरही विषयावर त्यांनी झटपट निर्णय दिले.पत्रकार पेन्शनचा विषय निघाला तेव्हा ‘पेन्शन देऊ पण आम्हाला टेन्शन देऊ नका’ असं ते गंमतीनं म्हणाले आणि ‘पेन्शन देताना कोणत्याही पत्रकारावर अन्याय होणार नाही किंवा पक्षपात होणार नाही याची काळजी घेण्याचं’ आश्वासन त्यानी दिलं.हे .मंदार पारकरचा वाढदिवस असल्याचं त्यांना सांगितल्यावर लगेच त्यांनी पुप्षगुच्छ देऊन त्याचंही स्वागत केलं.शुभेच्छा दिल्या.हे सारं आम्हाला अनपेक्षित तेवढंच सुखद धक्का देणारे होते …
वाळवा येथील तहसिलदारांना दिलेल्या खुर्चीचं महाराष्ट्रानं मोठं कौतूक केलं असं जेव्हा किरण नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं तेव्हा अत्यंत विनयपणे ते म्हणाले,’मी एवढं काय केलंय,, ? मी शिवसेनेच्या शाखेत गेल्यानंतरही शाखाप्रमुखाच्या खुर्चीवर बसत नाही.ती शाखा प्रमुखाची खुर्ची असते मी त्यालाच त्या खुर्चीवर बसवतो.वाळव्यातही मी तेच केलं..प्रत्येकाचा आदर करण्याची ही भावनाही आपण वेगळ्या राजवटीत आहोत याची जाणीव करून देणारी होती.कुठेही बडेजाव नाही,येणार्याचे दोन हात जोडून नम्रपणे स्वागत,देहबोली देखील सामांन्य,वागण्या-बोलण्यातही नम्रता..हे सारं पाहिल्यानंतर अगोदरची राजवट आणि आजची राजवट यात तुलना होणे स्वाभाविक आहे.
पत्रकारांचे प्रश्न घेऊन त्या त्या काळातील मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची संधी अनेकदा मिळाली.मात्र कालच्या भेटीत जो आपलेपणा दिसला,पत्रकारांच्या प्रश्नांसंबंधी जी आस्था दिसली ती क्वचितच यापुर्वी अनुभवता आली.मागील राजवटीत पत्रकारांचे काही प्रश्न जरूर मार्गी लागले.मात्र हे प्रश्न सोडवतानाचे भाव उपकाराचे होते..इथं आम्ही प्रश्न सोडवून तुमच्यावर उपकार करीत नाही आहोत याची जाणीव होती.
त्यामुळं पाच वर्षानंतर सहयाद्रीवर गेलो आणि एक सुखद आणि कायम स्मरणात राहणारा अनुभव घेऊन परतलो..उध्दवजी,मनापासून धन्यवाद….