गुन्हेशाखा पोलिसांनी जप्त केला शस्त्रसाठा
13 धारदार चाकू, फायटर व इतर औजार जप्त केले
विशेष प्रतिनिधि
नागपूर : हरियाणातील करनाल येथील इसमाला अटक करून गुन्हे शाखा पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला. सुरजित गुरचरण सिंग (वय ४७),असे अटकेतील इसमाचे नाव आहे. तो पाचपावलीतील बाबा बुद्धाजीनगर येथे राहात होता. शनिवारी गुन्हे शाखा पोलिस गस्त घालत होते. बाबा बुद्धाजीनगर येथे राहणाऱ्या एका इसमाकडे मोठा शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलिसांनी बाबा बुद्धाजीनगर भागात छापा टाकला. पोलिसांनी सुरजित याला अटक केली. त्याच्याकडून चाकू, फायटर आदीसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला. सुरजित याच्याविरुद्ध पाचपावली पोलिस स्टेशनमध्ये शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.