हिंगणघाट,औरंगाबाद जळीत कांडाचा शासनाने घेतला धसका.
बॉटल,कॅन मध्ये पेट्रोल देणे बंद/सर्वसामान्य निष्पापांना वेठीस धरण्याचा प्रकार.
विशेष प्रतिनिधि गौतम धोटे
कोरपना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे गेल्या आठवड्यात एका नराधमाने शिक्षिकेला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळल्याची हृदयविदारक घटना घडली.त्यानंतर उपचारादरम्यान त्या निष्पाप शिक्षिकेचा मृत्यू झाला.सदर घटनेमुळे अख्ख्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून सर्व स्तरातून या घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त होत आहे.आरोपीला फाशी द्या अशी मागणी होत आहे.मात्र हिंगणघाट अणि औरंगाबाद जळीत कांडाचा धसका शासनाने घेतल्याचे दिसत असून खाली बॉटल किंवा कॅन मध्ये पेट्रोल देण्यावर मनाई केली आहे.असे करताना आढळल्यास दंड प्रक्रिया संहिता १४९ प्रमाणे संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे लेखी स्वरूपात सांगण्यात आले आहे.त्यामूळे बॉटल,कॅन अशा इतर वस्तूंमध्ये खुले पेट्रोल देणेच बंद केले आहे.या निर्णयामुळे अनेक नागरिकांना मोठ्याप्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र असून बॉटल मध्ये पेट्रोल मिळत नसल्याने इतरांबरोबरच विशेषतः रस्त्यात बंद पडलेल्या मोटरसायकल चालकांवर एकप्रकारे जणू संकटच कोसळले आहे. कोरपना,जिवती हे तालुके अतिदुर्गम भाग म्हणून ओळखले जाते.रात्री बे रात्री मोठ्याप्रमाणात नागरिकांचे इतर ठिकाणी ये-जा सुरूच असते.जिवती तालुक्यात(पहाडावर)पेट्रोल पंप नसल्याने नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत असून पेट्रोल भरण्यासाठी यांना गडचांदूर गाठावे लागतो.लहान-लहान मुलांना सोबत घेऊन परिवारा सोबत बाहेर गावी ये-जा करताना बाईकचे कदाचित पेट्रोल संपले तर नाईलाजास्तव परिवाराला रस्त्यावरच सोडून बॉटल किंवा कॅन घेऊन पेट्रोलसाठी येणार्यांना जर पेट्रोल देण्यास मज्जाव केला जाणार तर ही बाब त्यांना मोठी त्रासदायक ठरणार.”करते कुणी आणि भरते कुणी” ही म्हण यानिमित्ताने सार्थक ठरत असून निव्वळ बॉटलीत पेट्रोल देण्यावर बंदी घातल्याने अशा अनपेक्षित घटनांवर अंकूश लावणे शक्य होणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करताना दिसत आहे.विनाकारण जनतेला वेठीस धरले जात असून वेळप्रसंगी पेट्रोल मागणाऱ्या व्यक्तीची व्यवस्थित शहानिशा करून पेट्रोल दिल्यास त्याचा त्रास दूर होण्यास मदत होईल असे मत व्यक्त होत आहे.अशा घटनांचा समूळ नायनाट करण्यासाठी सरकारने त्वरित कठोर कायदा करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.जेणेकरून भविष्यात हिंगणघाट,औरंगाबाद जळीत कांडाची पुनरावृत्ती होणार नाही.कायद्याची योग्य अंमलबजावणी झालीच पाहिजे तरीपण अशाप्रकारे कायद्याच्या चौकटीत बसवुन बिचाऱ्या सर्वसामान्य जनतेला हैराण करणे कितपत योग्य! अशी भावना व्यक्त होत आहे.ग्राहकांची योग्य चौकशी व शहानिशा करून बॉटलीत पेट्रोल द्यावे,लोकांना होणारा शारिरीक व मानसिक त्रास दूर करावा अशी मागणी-वजा विनंती नागरिकांकडून होत असून याविषयी आता शासन कोणती भूमिका घेतात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे हे मात्र नक्की.