*कोरोना कहर ब्रेकिंग*
*अनावश्यक खर्च टाळून प्रेमीयुगुलाने केला आदर्श विवाह*
*कोरोना प्रतिबंध: आधार केंद्रे ३१ मार्चपर्यंत; पानठेले वर्षभरासाठी बंद*
गडचिरोली प्रतिनिधी -सूरज कुकुडकर
गडचिरोली: राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून लागू केला आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्हयातील सर्व आधार केंद्रे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
शिवाय खर्रा,सुंगधित तंबाखू,गुटखा,पान मसाला,सुंगधित सुपारी यांचे उत्पादन,साठवणूक, वितरण व विक्रीवर एक वर्षाकरिता प्रतिबंध जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
*अनावश्यक खर्च टाळून प्रेमीयुगुलाने केला आदर्श विवाह*
कुरखेडा,ता.१८: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, एका प्रेमीयुगुलाने अनावश्यक खर्चाला फाटा देत अत्यंत साध्या पद्धतीने आपला विवाह पार पाडला. गुरुदेव सेवा मंडळाने त्यासाठी पुढाकार घेतला..
कुरखेडा तालुक्यातील चिचटोला येथील पुरुषोत्तम हरिदास नैताम(२४) व कोरची तालूक्यातील कोचीनारा येथील राधिका ओझाराम जमकातन (२२) या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. दोघांनीही कुटुंबीयांच्या सहमतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. १५ ते २२ मार्च या कालावधीत कुरखेडा येथे आयोजित भागवत सप्ताहात त्यांचा विवाह होणार होता. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी भागवत सप्ताह पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे प्रेमीयुगुलाने गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या पुढाकाराने मंडळाच्या सभागृहात निवडक नागरिकांच्या उपस्थितीत पारपंरिक हिंदू विवाह पद्धतीने दोघांचा विवाह पार पडला.
यावेळी तन्नूप्रसाद दुबे यानी मंत्रोच्चार व धार्मिक विधी करीत विवाह पार पाडला याप्रसंगी गुरूदेव सेवा मंडळाच्या अध्यक्ष सुधा नाकाडे, सचिव चरणदास कवाडकर, सदाशिव ब्राम्हणवाडे, अविनाश दुबे,जिल्हा परिषदेच्या माजी सभापती निरांजनी चंदेल,माजी जिल्हा परिषद सदस्य आशा कुमरे, आशा बानबले, ओमकार ठलाल तसेच दोघांचेही कुटुंबीय व गावकरी उपस्थित होते.
*गडचिरोली जिल्ह्यातील २९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला स्थगिती*
गडचिरोली,ता.१७: कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने २९ मार्चला होणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील २९६ ग्रामपंचायतींची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने राज्यातील १५७० ग्रामपंचायती व इतर स्थानिक स्वराज्य् संस्थेच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा आदेश आज जारी केला. या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील; त्याच टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत त्या स्थगित करण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. चार दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र सादर करण्यास १६ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. शिवाय नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडण्याच्या आदेशाला शिथिलता दिल्याने इच्छूक उमेदवारांचा जीव भांड्यात पडला होता. आता निवडणुकाच पुढे ढकलल्याने उमेदवारांना प्रचारासाठी बराच वेळ मिळणार असून, तप्त होत चाललेले गावातील राजकीय वातावरण शांत होणार आहे.