*जहाल नक्षली, कसनसूर दलम डीव्हीसी सृजनक्का चकमकीत ठार*
गडचिरोली प्रतिनिधी -सूरज कुकुडकर
गडचिरोली- जहाल नक्षली व कसनसूर दलमची विभागीय समिती सदस्य (डीव्हीसी) सृजनक्का ही आज एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली. शासनाने तिच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस विभागाच्या सी-६० पथकाचे जवान आज दुपारी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिनभट्टी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना तेथे नक्षल्यांचे शिबिर सुरु असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षल्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, एका महिला नक्षलीचा मृतदेह सापडला. मृतदेह गडचिरोली येथे आणण्यात आल्यानंतर आत्मसमर्पित नक्षलींद्वारे मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. मृत नक्षली ही सृजनक्का असल्याची खात्री पटली.
*नक्षली तपशिल*
सृजनक्का हिचे मूळ नाव जैनी चैतू अर्का असे असून, ती भामरागड तालुक्यातील गोपनार येथील मूळ रहिवासी होती. ती सृजनक्का व चिनक्का या नावांनी नक्षल दलममध्ये ओळखली जायची. नक्षल चळवळीतील सीसीएम संजीव उर्फ देवजी याची ती पत्नी होती. १९८८ मध्ये ती भामरागड दलममध्ये भरती झाली. तिने आतापर्यंत विविध दलममध्ये काम केले असून, २०१२ पर्यंत ती टिप्पागड दलमची इन्चार्ज होती. सध्या ती कसनसूर एरियाची डीव्हीसी म्हणून कार्यरत होती.
*पोलीस विभागाचे मोठे यश*
विविध पोलिस ठाण्यांमध्ये सृजनककावर १४४ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने तिच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक एके-४७ रायफल, प्रेशर कूकर, क्लेमोर माईन तसेच नक्षल्यांचे दैनंदिन वापराचे साहित्य ताब्यात घेतले आहे.
जून २०१९ मध्ये जहाल नक्षली नर्मदाक्का हिला पोलिसांनी तिच्या पतीसह अटक केली होती. तिच्या अटकेनंतर दक्षिण भागात सृजनक्काकडे महत्वाची जबाबदारी आली होती. परंतु आता सृजनकका चकमकीत ठार झाल्याने नक्षल्यांना मोठा हादरा बसला आहे.