*ही राजकारणाची वेळ नव्हे : सुनील केदारांनी खडसावले*
*महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन सामंजस्याने काम करण्याची गरज आहे*
सध्या नागपूर कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करीत आहे. शहराचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत राजकारण आणि आपसातील हेवेदावे सोडून महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन सामंजस्याने काम करण्याची गरज आहे.
मुख्य संपादक- किशोर ढूंढेले
नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव धुडकावून लावणाऱ्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांना राज्याचे पशुसंवर्धनमंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुनील केदार यांनी चांगलेच खडसावले आहे. ही वेळ राजकारण करण्याची नसून, कोरोनाशी एकत्रित मुकाबला करण्याची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
महापालिकेने नागनदी शुद्धीकरण, हुडकेश्वर नरसाळा पाणीपुरवठा, पायाभूत सुविधांसाठी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या कर्मचाऱ्यांची मुदत संपली होती. या सर्व कर्मचाऱ्यांच्या कालावधीस आयुक्त मुंढे यांनी मुदतवाढ दिली. कार्योत्तर मंजुरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवण्यात आला होता. मात्र, स्थायी समितीचे सभापती पिंटू झलके यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. महापौर तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या सूचना आणि प्रस्ताव आयुक्त नाकारत असल्याने याचा वचपा स्थायी समितीमार्फत काढण्यात आला. या निर्णयाच्या विरोधात केदार यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे.
सध्या नागपूर कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करीत आहे. शहराचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत राजकारण आणि आपसातील हेवेदावे सोडून महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन सामंजस्याने काम करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, मुंढे यांनी या कर्मचाऱ्यांना नेमले नव्हते. यापूर्वीसुद्धा त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांची गरज असल्याने त्यांना मुदवाढ देण्यात आली. मुंढे यांच्या विरोधात राजकारण करण्यास भविष्यात भरपूर संधी येतील. सध्याची वेळ भांडणाची नाही. किमान वेळ, काळ आणि प्रसंग याचे भान पदाधिकऱ्यांनी ठेवायला हवे, अशा शब्दांत केदार यांनी मनपाच्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.