एलसीबीने कोरची तालुक्यातून जप्त केली ५४ लाखांची दारु; सात जणांना अटक
गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर
गडचिरोली– दारुबंदी असतानाही मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने गडचिरोली जिल्ह्यात विक्रीसाठी दारु आणत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज पहाटे ५४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या दारुसह एक मेटॅडोर जप्त केला. याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली असून, दोघे फरार आहेत. लॉकडाऊनच्या काळातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, काही जण मध्यप्रदेशातून दारु आणून ती गडचिरोली जिल्ह्यातील कोरची व इतर तालुक्यांमध्ये विक्री करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास पोलिसांनी कोरची तालुक्यातील खुर्शीपार येथे पाळत ठेवली. यावेळी एका मेटॅडोरमधून तब्बल ६०० पेट्या देशी दारु जप्त करण्यात आली. दारु, मेटॅडोर, एक मोटरसायकल, ३ मोबाईल व अन्य साहित्य असा एकूण ६० लाख ५७ हजार रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत सगणे यांच्या फियार्दीवरुन पोलिसांनी तरुण उर्फ नितीन निर्मल धमगाये, महेश उर्फ गोलू प्रकाश मुंगनकर, प्रेमसिंग राजपूत, मंगनसिंह राजपूत, मदन गोटा, विनोद ताडामी, विनोद शेंडे या सात जणांना अटक केली, तर तिलक उंदिरवाडे व सचिन भोयर हे फरार आहेत.
*समोर दारुच्या पेट्या, मागे किराणा सामान*
दारु विक्रेत्यांनी यावेळी वेगळीच शक्कल लढविली होती. कुणाला संशय येऊ नये म्हणून मेटॅडोरच्या समोरच्या भागात दारुच्या पेट्या ठेवल्या, तर मागच्या भागात किराणा सामान होता. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दारु तस्करांची ही योजना उधळून लावली. जिल्ह्याच्या सीमा बंद असतानाही एवढी दारु कुणाच्या मर्जीने येत होती? यापूर्वीही अशी किती दारु आली असावी? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आठवडाभरापूर्वी गोंदिया जिल्ह्यातून कुरखेडा-कढोलीमार्गे एका ट्रकमधून गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर दारु आणण्यात आल्याची चर्चा आहे.