*उठवलेली दारूबंदी हे शासनाचे अतर्क्य पाऊल–
डॉ अभय बंग*
गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर
गडचिरोली: केंद्र व राज्य शासनाने कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी अतिशय स्तुत्य पावले आतापर्यंत उचलली.. पण रविवारी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपता संपता देशातील रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित सर्वच ठिकाणी दारूबंदी उठवली. हा निर्णय अतर्क्य आणि तितकाच धोक्याचा असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनामुळे आजच्या तारखेपर्यंत भारतात ४२ हजारांवर लोकांना कोरोना आजाराचा संसर्ग झाला आहे, तर १३०० च्या वर मृत्यू झाले आहेत. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. पण, त्याचवेळी भारतात दरवर्षी दारूमुळे पाच लक्षं मृत्यू होतात. भारतातील ५ कोटी लोक दारूच्या व्यसनाने ग्रासित असल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगत आहे. म्हणजे कोरोना संसर्ग आणि होणार्या मृत्यूपेक्षा दारूचे व्यसन आणि त्यामुळे भारतात होणारे मृत्यू हजार पटीने जास्त आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक प्रकारची बंदी कायम ठेवताना शासनाने दारूच्या विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे शासनाने हत्ती सोडला आणि शेपूट धरून ठेवले आहे. त्यामुळेच हे अतर्क्य पाऊल असल्याचे डॉ. बंग म्हणाले.
दारूची दुकाने उघडल्याने तेथे गर्दी होणार आणि सुरक्षित अंतर पाळले जाणार नाही, ही शक्यता जास्त आहे. तिथे नियमही तोडले जातील. या गर्दीमधून पुरुष दारूच्या बाटलीवाटे घरी कोरोना घेऊन येतील. सोबतच घरपोच हिंसाही घेऊन येतील. त्यामुळे लोकांना घरपोच कोरोना पोहोचविण्याची योजना असावी असे स्वरूप शासनाच्या या निर्णयामुळे निर्माण होईल, असे डॉ. बंग म्हणाले.
कोरोनामुळे शासनाने महिनाभरापासून दारू, खर्रा व तंबाखूवर बंदी घातली होती. त्याचा हजारो पटीने फायदा या काळात झाला. ही बंदी कायम ठेवली असती तर लोकांचा आणखी फायदा झाला असता. पण दुर्दैव असे की, दारुमुळे मार खाणारी जनता बोलत नाही. ती उलट दारूच्या दुकानसमोर रांग लावते. जनतेचे हित आणि आरोग्य हा जर शासनाचा हेतू आहे, तर अशा निर्णयामुळे त्यावर पाणी फेरले जात असल्याचे डॉ. बंग म्हणाले. कामबंद, कमाई बंद;पण दारू सुरू हे करण्यामागचे रहस्य काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे