*लोकबिरादरी’च्या महिलांनी बनविले अडीच हजार मास्क*
गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर
गडचिरोली: समाजसेवेचा वसा घेतलेल्या थोर समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पातील महिला कार्यकर्त्यांनी तब्बल अडीच हजार मास्क बनवून गोरगरीब नागरिकांना ते मोफत वाटप केले आहेत.
भामरागड तालुक्याच्या अभावग्रस्त भागात आरोग्य सेवा आणि आदिवासींच्या मुलांना उत्तम प्रकारचे शिक्षण देण्याचे अव्याहत काम हेमलकसा येथिल लोकबिरादरी प्रकल्प मागील ४७ वर्षांपासून करीत आहे. गरीब आदिवासी अन्नधान्याच्या बाबतीतही स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी अलिकडच्या दोन-तीन वर्षांपासून काही गावांमध्ये अनिकेत आमटे यांच्या नेतृत्वात तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. लोक बिरादरी प्रकल्पाने आतापर्यंत भामरागड तालुक्यातील विविध गावांत २१ तलावांची निर्मिती केली आहे. टाळेबंदीपूर्वी मार्च महिन्यात भामरागड तालुक्यातील परायनार या गावात तलावाची निर्मिती पूर्ण केली आहे.
त्यानंतर ५ मे रोजी अहेरी तालुक्यातील मेडपल्ली गावात नवीन तलाव निर्मितीच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. तहसील कार्यालयाकडून कायदेशीर परवानगी घेऊन हे काम सुरू केले आहे. अहेरी तालुक्यातील हा पहिलाच तलाव आहे. यात १५ टक्के गावाचा सहभाग आहे. यंदाचे हे शेवटचे काम आहे. या कामावरील मजूर आणि गावातील आदिवासी नागरिकांनाही मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. गोरगरिबांचे कोरोनापासून रक्षण व्हावे, यासाठी मास्क वाटप करीत असल्याचे अनिकेत आमटे यांनी सांगितले.