आपल्या गावी जायचंय, ई-पास हवा आहे? या ठिकाणी करा अर्ज – नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे
लॉकडाऊनमुळं नागपुरात राज्यातील, परराज्यातील विद्यार्थी, नोकरदार तसेच मजूर, कामगार अडकून पडले आहेत. मात्र, त्यांना आता गावी जाता येणार आहे. पण त्यासाठी काही अटी आहेत. गावी जाण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे.
विशेष प्रतिनिधी नागपूर
नागपूर: लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राज्यातील अथवा परराज्यातील मजूर, पर्यटक, विद्यार्थी आदींना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी काही अटींवर मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यात आणि परराज्यात अडकून पडलेले असल्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ निवासाच्या ठिकाणी जाण्यासाठी सरकारने काही अटींवर परवानगी दिली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांच्या nagpur.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी याचे नावे सादर करणे आवश्यक आहे.
ई-पाससाठी अर्ज करताना ‘हे’ कराल!
जिल्हाधिकारी किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या नावाने अर्ज करा
स्वतःचे वाहन अथवा सरकारी सुविधेचा उल्लेख करावा
संपूर्ण पत्ता, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी नमूद करावा
कोठे जायचे आहे, त्याचे कारणही द्यावे लागेल.
किती व्यक्ती आहेत, याचा तपशील अर्जात सादर करणे आवश्यक
कुणाशी संपर्क साधाल?
>> परराज्यातील मजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंद करावी.
>> ग्रामीण भागातील मजुरांनी संबंधित तहसीलदारांकडे नाव नोंदवावे
>> नगरपालिका क्षेत्रातील मजुरांनी मुख्याधिकाऱ्यांकडे नोंद करावी
>> महानगरांतील मजुरांनी महापालिका आयुक्तांकडे नोंद करावी