*गोपीनाथजींच्या संघर्षाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करु या
– आ. सुधीर मुनगंटीवार*
*आ. मुनगंटीवार यांनी दिला गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा*
कोरपना प्रतिनिधि-गौतम धोटे
चंद्रपूर .-स्व. गोपीनाथजी मुंडे हे अलौकिक व्यक्तीमत्वाचे धनी होते. भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी अवघे आयुष्य खर्ची घालणा-या या लोकनेत्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात कमळ रुजविण्यासाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण करत व त्यांनी दाखविलेल्या संघर्षाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याचे आवाहन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मराठवाडा युवक विकास मंडळाद्वारे आयोजित कोविड-19 संघर्ष योध्दा संम्मेलनात आ. मुनगंटीवार बोलत होते. तत्पुर्वी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला मालापर्ण करुन त्यांच्या स्मृतीस आ. मुनगंटीवार यांनी अभिवादन केले.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले, गोपीनाथजी म्हणजे दिन, दुर्बल, शोषित पिढीतांचा आवाज होते. त्यांच्या भाषणात महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन असायचे, वंचितांचा आवाज असायचा. विधिमंडळातील त्यांची भाषणे ऐकण्यासाठी कोरम पुर्ण असायचा. विधिमंडळातील कर्मचारी सुध्दा त्यांची भाषणे मनापासुन ऐकायचे. राज्यात एकदा गणपती दुध पितो अशी अंधश्रध्दा पसरविणारी घटना घडली, त्यावेळी या घटनेचे समर्थन न करता अंधश्रध्देवर प्रहार करणारे गोपीनाथजी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे नेते होते. ओबीसींची जनगणना झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला. मराठवाडा विद्यापिठाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी जो नामांतराचा संघर्ष झाला त्या संघर्षाला पाठींबा देणारा हा नेता मोठया मनाचा नेता होता. कोणत्याही कार्यक्रमाला ते उशीरा पोहचायचे. या संदर्भात त्यांची भुमिका स्पष्ट होती. मी राजकीय पदासाठी, विधानसभा, लोकसभेतील खुर्चीसाठी नेता झालो नाही तर सर्व सामान्यांच्या मनातले स्थान माझ्यासाठी महत्वाचे आहे. त्यांना भेट नाकारुन मी पुढे जावु शकत नाही म्हणुन कार्यक्रमाला जायला उशीर होतो असे ते स्पष्टपणे सांगायचे असेही आ. मुनगंटीवार बोलताना म्हणाले.
संघर्षयात्रेच्या माध्यमातुन महाराष्ट्र पिंजुन काढला व त्यानंतर राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आले. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणुन गुन्हेगारीचा बिमोड करण्याची भुमिका त्यांनी घेतली. दाऊदच्या माणसांनी त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या मात्र धमक्यांना न घाबरता आपल्या भुमिकेवर ते ठाम राहीले. आज त्यांचा तोच संघर्षाचा वारसा पंकजाताई मुंडे पुढे नेत आहे. गोपीनाथजी जेव्हा चंद्रपूरला यायचे तेव्हा त्यांच्या गाडीमागे धावणारा कार्यकर्ता भाजपाचा प्रदेश अध्यक्ष म्हणुन त्यांच्या गाडीत सोबत बसण्याचे भाग्य मला लाभले या अर्थाने मी स्वतःला भाग्यवान समजतो असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी आपल्या संबोधनातुन गोपीनाथ मुंडे यांच्या विषयीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी माजी मंत्री पंकजाताई मुंडे, अशोकराव कुकडे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संयोजक प्रविण घुगे यांनी प्रास्ताविक केले.