*गडचिरोली जिल्हृयात पुन्हा १८ कोरोना रुग्णांची भर; केवळ आजची रुग्णसंख्या ४१*
गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर
गडचिरोली: गडचिरोली जिल्हयात आज सकाळी २३ कोरोना बाधित रूग्ण अढळल्यानंतर पुन्हा सहा तालुक्यांत १८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे केवळ आज आढळलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४१ वर पोहचली आहे, तर आतापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या ११५ झाली आहे.
आज सकाळी गडचिरोली येथे केंद्रीय राखीव दलाचे २२ जवान व भामरागड तालुक्यातील एक इसम कोरोनाबाधित आढळून आले. हे सर्वजण दुसऱ्या राज्यातून व जिल्ह्यातून आले होते. तसेच ते संस्थात्मक विलगीकरणात होते. त्यानंतर संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार, आढळलेल्या १८ रुग्णांपैकी १७ जण गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणातील होते, तर एक जण अहेरी येथील यापूर्वी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे. त्यात १६ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले आहेत.
यामुळे जिल्हयातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ११५ झाली, त्यामधील ८ रूग्णांच्या नोंदी त्यांच्या स्वजिल्हयात करण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्हयातील एकूण कोरोना रूग्णांच्या नोंदी सद्या १०७ असणार आहेत. आतापर्यंत ५९ रूग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे. सद्या जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या ४७ आहे. तसेच जिल्हयाबाहेरील उपचार घेत असलेले इतर ८ रूग्ण आहेत. आतापर्यंत जिल्हयात आढळून आलेल्या ११५ कोरोना रूग्णांमध्ये २६ सीआरपीएफचे जवान, २ बीएसएफचे जवान, ४३ कामगार तर इतर ४४ व्यक्तींचा समावेश आहे.
*नागरिकांनी अधिक सतर्क राहावे : जिल्हाधिकारी दीपक सिंगला*
जिल्हयात कोरोना संख्या एकदम एका दिवशी मोठया संख्येने वाढल्यामुळे प्रशासन अधिक काळजी घेत आहे. यामध्ये नागरिकांनी घाबरून न जाता संसर्ग होऊ नये म्हणून अधिक सतर्क राहावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला मास्क किंवा रूमाल लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.