*लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयातून जिल्ह्याचा विकास शक्य:पालकमंत्री एकनाथ शिंदे*
गढ़चिरोली जिल्हा प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर
गडचिरोली: राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सिरोंचा व अहेरी येथे भेट देऊन अधिकारी व नागरिकांशी चर्चा केली. जिल्ह्यातील दुर्गम भागातील विविध योजनांची अंमलबजावणी करताना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन यांनी समन्वयातून काम केल्यास चांगल्याप्रकारे विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले.
श्री.शिंदे यांनी सिरोंचा येथील कोविड सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी ब्रिटीशकालीन तहसील कार्यालयास भेट देऊन तेथे त्यांनी वृक्षरोपण केले. त्यानंतर त्यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या पातागुडम पुलाची पाहणी केली. छत्तीसगड सीमेवरील शेजारच्या संवेदनशील परिसरातील गावांना भेट देत पालकमत्र्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. नक्षलपीडित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
शिवाय दुर्गम व अतिशय संवेदनशील भागात आऊटपोस्टवर असलेल्या जवानांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रशासनाला त्या सोडविण्याचे निर्देश दिले. पातागुडम येथील पोलिस ठाण्याला भेट देऊन तेथील पोलिस, एसआरपीएफ, बीएसएफ जवानांकरिता उभारण्यात आलेले वसतिगृह, कॅन्टीन व इतर व्यवस्थापनाचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडविण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर मेडिगट्टा प्रकल्पाची पाहणी करुन सिरोंचा तालुक्यातील प्रकल्पासाठी वापरलेल्या जमिनीची त्यांनी हवाई पाहणी केली. रस्ते, इतर प्रलंबित कामे पूर्ण करून या भागातील लोकांना रोजगार व हाताला काम दिल्यास नक्षलवाद कमी होईल असे मत त्यानी व्यक्त केले.
त्यानंतर श्री.शिंदे यांनी अहेरी येथे आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली. धर्मरावबाबा आत्राम व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी त्यांचे स्वागत केले. धर्मरावबाबांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील समस्या पालकमंत्र्यांच्या कानावर घातल्या. गडचिरोली जिल्हा निसर्गरम्य असून, येथे वनोपजावर आधारित उद्योग निर्मितीसाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, बबलू हकीम, शाहिना हकीम, तनुश्री आत्राम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी आलापल्ली येथील कोविड सेंटरलाही भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार सिरोंचा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे, मुख्याधिकारी विशाल पाटील, नायब तहसीलदार हमीद सय्यद, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वलके उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज