*धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करु नयेत!*
*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर ची रामटेक चे खासदार मा.कृपाल जी तुमाने यांना निवेदन देऊन मागणी.*
( धनगड नाही,धांगड आहेत.धनगर ही जात आहे,जमात नाही.)
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- धनगर ,धनगड हे दोन्हीही शब्द अनुसूचित जमातीच्या सुचित नाहीत. धनगड ही जमातच नाही. तरीही काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधीकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सुचित घुसविण्यासाठी असंवैधानिक मागणीचा पाठपुरावा करतांना दिसत आहे. याबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नागपूर विभाग जाहीर निषेध नोंदवित आहे.
महाराष्ट्राच्या सुचित Dhangad या शब्दाचे भाषांतर धनगड असे केल्या जात आहे.त्याचे भाषांतर धांगड असे हवे आहे.महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक ३६ वर ओराँन जमात आहे.तीची पोटजमात धांगड आहे.ओराँन ही भारतातील प्रमुख जमात आहे.तीला ७ राज्याच्या सुचित दर्शविले आहे.महाराष्ट्रात ओराँन, धांगड नाहीत. पण सुचित आहे.संविधान आदेश १९५० मध्ये प्रमुख जमाती नंतर तीची पोटजमात दर्शविली आहे.१) बिहार २५ – ओराँन.२)मध्यप्रदेश ३५ – ओराँन, धानका,धांगड.३) महाराष्ट्र ३६- ओराँन, धांगड.४)ओरीसा ५३ – ओराँन.५) पश्चिम बंगाल ३५ – ओराँन.६) छत्तीसगड ३३- ओराँन, धानका,धांगड.७)झारखंड – ओराँन, धांगड.
ओराँनच्या शेतात ,घरी रोजंदार म्हणून काम करणारी धांगड ही जमात होय.या दोन्ही जमातीचे खानपान ,रितीरिवाज, प्रथा,परंपरा, विधीसंस्कार सारखेच आहेत.ओराँन ,धांगड जमातीचे लोक धर्मीज नावाच्या महादेवाची पुजा करतात. अन्नाकौरी किंवा महाधारी देवता यांच्यात आहे.त्यांचा मुख्य सण सरहुल आहे.ओराँन, धांगड लोक उरीया किंवा हिंदी भाषा बोलतात. धनगर जातीचा या जमातीशी तीळमात्र संबंध नाही.
महाराष्ट्र शासनाने सीबीसी १०७८/४३४१८/डी – ५ दि.१२ जून १९७९ ला धनगराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता.यावर संबंधित विभागात सखोल चर्चा ही झाली पण धनगर समाज आदिवासींचे निकष पुर्ण करु शकत नसल्याने हा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आणि अखेर महाराष्ट्र शासनाने १९८१ मध्ये आपला प्रस्ताव मागे घेतला.
१२ जुलै २००५ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या सभापतीने खास बैठक घेऊन धनगरांच्या प्रश्नावर चर्चा केली, धनगर जातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्यात येते का ? याकरीता संशोधन पथक तयार करून २००६ साली एप्रिल महिन्यात बिहार, ओरीसा व झारखंड राज्यात पाठविण्यात आले.धनगर जातीला या राज्यात समाविष्ट केले आहेत काय ? याचा शोध घेणे.या संशोधन पथकाने १ जून २००६ रोजी अहवाल सादर केला.त्याचा क्रमांक – आसंप्रसं/धनगर/प्र.क्र.३७२/का-४(सं)०६-१३० असा आहे.पथकाने असे लिहिले आहे की, ओराँन जमातीतील जे लोक
दुसऱ्याच्या शेतावर अथवा घरात मजूर म्हणून काम करतात त्यांना धांगड असे म्हणतात. त्यामुळे बिहार, ओरीसा, झारखंड या राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे.तथापि धांगड या शब्दाचे इंग्रजी मध्ये Dhangad असे स्पेलींग होते. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या यादीत Dhangad धांगड ही ओराँनची तत्सम जमात म्हणून नमूद केले आहे. या दोन्ही जमाती आणि धनगर भिन्न आहे.धनगर ही जात आहे जमात नाही.
१९११ ची जनगणना बघा .यात तक्ता क्रमांक ६ केवळ जातीचा आहे.त्यामध्ये क्रमांक ७ वर धनगर व त्याची जात भारवाड, कुरुळा अशी नोंद आहे. १९११ मध्ये बाँम्बे प्रेसीडेंन्सी ,सी.पी.अँड बेरार ,मराठवाडा या तीन प्रातांत धनगर जात म्हणून उल्लेख आहे.जमात म्हणून नाही. या तक्त्यात २८ जाती आहेत .
आता १९३१ ची जनगणना बघा, ही जनगणना जे.एच.हट्टन यांनी केली आहे. ते १९२९ ते १९३३ पर्यंत जनगणना आयुक्त होते.या जनगणनेचे शिर्षकच Census of India 1931 with complete survey of trouble life and system खंड ३ मध्ये पान क्रमांक ६६ वर हट्टन यांनी भटक्या जातीचा तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये क्रमांक ४ वर धनगर जात आहे. खंड दोन मध्ये पान क्रमांक १५७ वर काही निवडक जाती दिल्या आहेत.पुढे पान क्रमांक १६६ वर जात क्रमांक ३० वर गडरीया नावाच्या मुख्य जातीची नोंद आहे. उपजमातीची नावे भाखड,धनगर आहे.ज्या प्रदेशात त्यांची नावे व धर्म नमूद केले आहेत.बाँम्बे ( हिंदू ) , बडोदा ( हिंदू ) याचा अर्थ धनगर हिंदू आहे.धनगर ही जात आहे जमात नाही. या उलट आदिवासींची नोंद जमात अशी आहे.
आता अलाहाबाद कोर्टाचा निकाल बघा . उत्तरप्रदेशात आँल इंडिया धनगर समाज महासंघाने अलाहाबाद कोर्टात १७/७/२००९ रोजी याचिका दाखल केली होती. Writ c no. 40462 / 2009 मा.न्यायालयाने दि.१४/३/२०१४ रोजी दिला की धनगर ही जात आहे,जमात नाही. त्यामुळे ती अनुसूचित जातीच्या (sc ) प्रवर्गात येत असून त्यांना जातीचे प्रमाणपत्र द्यावे.मा.अलाहाबाद हायकोर्टाने दुसराही writ c no.12436/2007 निर्णय दिला की धनगरांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र द्यावे.
आता दि.३/१२/२०१२ रोजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची २९ वी बैठक बघा .एकूण १७ विषयाच्या अनुषंगाने आयोगाने निर्णय घेतले , आयोगाच्या बैठकीत क्र.१७ वर धनगर जातीचा विषय होता.राज्यात अनुसूचित जातीच्या सुचित Dhangar या शब्दाचा अंतर्भाव करावा अशी सुचना येथे करण्यात आली. अनुसूचित जाती आयोगाने लखनौ येथील राज्य सरकारच्या कार्यालयास सुचना करुन सांगितले की, धनगरांच्या वस्त्यात जाऊन प्रत्यक्ष चौकशी करुन १७/१०/२०१२ पर्यंत त्याचा अहवाल आयोगाकडे पाठवावा. राज्य सरकारच्या संबंधित खात्यातील अधिका-यांना मथुरा ,आग्रा जिल्ह्यात प्रत्यक्ष जाऊन १३२ धनगर व्यक्तीकडून विविध माध्यमातून माहिती गोळा केली. आणि अनुसूचित जाती आयोगास पाठविली. आयोगाने निर्णय दिला की, उत्तर प्रदेशातील धनगर जातीला अनुसूचित अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे यावरुन लक्षात येते की धनगर ही जात आहे.आदिवासी जमात नाही. जमात म्हणून धनगराचा कुठेही उल्लेख नाही .
धनगर आदिवासी नाहीत ऐतिहासिक पुरावे
१) मागील ३०० वर्षाचा इतिहास चाळला तर लक्षात येईल की,आदिवासी आणि धनगर हे दोन भिन्न समाज आहे.इतिहासकारांनी मल्हारराव होळकर व अहिल्याबाई होळकर यांच्या संघर्ष व लढाईला कुठेही आदिवासींचा संघर्ष व लढाई म्हटले नाहीत.
२) यवतमाळ जिल्हा गँझेट १९०८ पान क्र.२०१ वर धनोजे कुणबी व धनगर एकच समाज असल्याचे म्हटले आहे.
३) जातीविवेक या ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे की,धनगर हे शुद्रपिता आणि महिश्या माता ह्यांची संतान आहे पुढे असेही सांगितले की,महिश्या हा क्षत्रिय पुरुष आणि वैश्य माता ह्यांचे अपत्य आहे.
४) डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तिसरे अधिवेशन पंढरपूर येथे भरविले होते .तेव्हा धनगरांनी त्या अधिवेशनाला जाहिरात दिली होती.ती क्षत्रिय धनगर अशी होती.
५) आर.ई.ईन्थाव्हेन यांनी खंड क्र.१ मध्ये धनगर जातीची माहिती दिली आहे. ते म्हणतात दक्षिणेतील धनगर आणि उत्तर भारतातील धांगड हे दोन्ही समाज एक नाहीत. ईन्थाव्हेन धनगराच्या २३ पोटजातीही सांगतात.
६) आर.व्ही.रसेल हे धनगरांना जमात न म्हणतात जात म्हणूनच लिहतात, धनगर ही मेंढपाळ आणि ब्लँकेट विणणा-या लोकांची मराठा जात आहे असे म्हणतात.
७) महात्मा फुले शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात म्हणतात की,जे शुद्ध शेती करतात ते कुणबी, जे बागायती शेती करतात ते माळी,जे शेती- बागायती करुन शेळी – मेंढी पाळतात ते धनगर. मुळात मराठा, कुणबी माळी व धनगर इत्यादी प्राचीन काळी एकच असावे असेही म्हणतात.
८) धनगर मराठ्यांची उपजात – धनगर हा शब्द संस्कृत शब्द धेनुगर यापासून आला आहे.असे अभ्यासक म्हणतात धेनुगर म्हणजे गाई पाळणारा,दुसरीकडे या शब्दाचा अर्थ धनवान, धनदांडगा व भरपूर धनदौलत ,कारण धनगराची एक पोटजात हटकर आहे.ही जात अत्यंत गर्भश्रीमंत असून पुर्वी या जातीचा थाट एखाद्या राजापेक्षा कमी नव्हता. धनगर ही जात शारीरिक वैशिष्ट्ये आणि सामाजिक रितीरिवाजाच्या द्रुष्टीने मराठा-कुणबी समाजाच्या जवळची वाटते.म्हणून इतिहास कारांच्या मते ही जात मराठा जातीचीच उपजात आहे.धनगर समाजाच्या पोटजातीची जी यादी आहे त्यामध्ये अहिराच्या नंतर क्रमांक २ वर असल किंवा मराठा ( maratha ) अशी जात आहे.म्हणून इतिहास संशोधकांनी धनगर हे मराठा, कुणबी जातीची उपजात होय असे म्हटले आहे.
९) राजर्षी शाहू महाराजांनी ३० डिसेंबर १९३० साली धनगरातील होळकर आणि मराठ्यातील घाटगे या दोन कुटुंबात विवाह संबंध जुळवून आणले तसेच मराठा व धनगर यांचे २५ सामुहिक विवाह केल्याची नोंद सत्याग्रही चा मराठा विशेषांक २००० मध्ये आहे.या विवाह संबंधातून मराठा आणि धनगर सामाजिक प्रतिष्ठा स्तरावर समान आहेत.
एकंदरीत ओराँन ,धांगड या जमातीशी धनगर या जातीचा तीळमात्रही संबंध नाही. धनगर ही जात आहे,जमात नाही. ते आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाही. धनगर आदिवासी नाहीत ,धनगर जातीच्या नेत्यांची व काही गैरआदिवासी लोकप्रतिनिधींची मागणीच असंवैधानिक आहे.
त्यामुळे त्यांचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करु नये.कारण महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत क्र.३६ वर ओराँन, धांगड आहे. पण त्या राज्यात नाहीत.सुचितील शब्द धनगड किंवा धनगर नाही.असे निवेदन मा.कृपाल जी तुमाने,खासदार,रामटेक यांना देण्यात आले यावेळी,परिषदेचे दिनेश शेराम,स्वप्नील मसराम,विजय परतेकी,राहुल मडावी,सुरेंद्र नैताम, शाम कुमरे उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज