*मोहाच्या झाडाला राजश्रय येणे काळाची गरज*
*मोहवृक्ष आयुर्वेद चिकित्सा गुणधर्म संशोधनाची गरज – आमदार डॉ देवराव होळी*
गढ़चिरौली प्रतिनिधि – सूरज कुकुड़कर
गडचिरोली –मध्य भारतात किमान 50 जिल्ह्यांत आदिवासींना रोजगार देणारे झाड म्हणजेच आदिवाची बांधवांचा कल्पवृक्ष मोह होय ? इतर अनेकांसाठी हे फक्त एक झाड म्हणून गणले जाते परंतु आदिवासी लोकांसाठी हे झाड ‘मोठा देव’ आहे. याच झाडाच्या खाली ‘मुटम्या देव’ किंवा मोठा देव मांडल्या जाते , आमच्या ग्रामीण भागात आजही
मोहाची साल पाण्यात शिजवली जाते आणि एखाद्या मनुष्याच्या अंगात जर थंडी भरली असेल तर किंवा त्याचे अंग दुखत असेल तर अशा पाण्याने त्या मनुष्याची आंघोळ केली जाते, याचा त्वरित फायदा होत असतो. गायी किंवा बैलांचे शरीर सुद्धा आजही आमच्या ग्रामीण भागात मोहाच्या सालीने शेकले जाते.
मोहाच्या पानाच्या पत्रावळी, द्रोण बनवले जातात. गावागावांत जंगलातून मोहाची पाने गोळा करून उन्हाळ्याच्या दिवसात पत्रावळी तयार करून लग्नकार्य व इतर समारंभात मोठ्या प्रमाणात विकल्या जातात आदिवासींना या पत्रावळी पासून मोठा रोजगार मिळत आहे गडचिरोली कडील पत्रावळी संपूर्ण देशात प्रसिद्ध होत आहे पित्रुमोक्ष चे वेळी तर्पण करण्यासाठी पत्रावळीवर अन्न ठेवून आपल्या पूर्वजांना अर्पण केले जाते. मोहाचे स्थान निव्वळच आदिवासी नाही तर सर्वसामान्य लोकांच्या जीवनात सुद्धा त्यांच्या धर्म कार्यात, त्यांच्या लग्नकार्यात आणि सामाजिक जीवनात फार महत्वाचे स्थान आहे. असे नाही तर ग्रामीण भागात आजही मोहाच्या पत्रावळीत आजही लग्न सोहळा व सामाजिक कार्यात जेवण वाढले जाते , मोहाच्या पानापासून तयार करण्यात आलेल्या पत्रावळी पासून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक महिला बचत गटांना रोजगार प्राप्त झाला आहे !
मोहाचे अनंत गुण आणि कार्य असताना मोह फक्त दारू साठी बदनाम करण्यात आलेला आहे, मोहामुळे आदिवासीची सुद्धा बदनाम केली जाते, खरे तर ते आमच्या शहरी लोकांपेक्षा जास्त सुसंस्कृत आहेत.आदिवासी माडीया समाजाचे कार्यक्रम मी माझ्या स्वतः चे घरी आखो देखी पाहिले आहेत , जन्म होताना, लग्न होताना आणि मरताना सुद्धा मोह वृक्ष आदिवासींचा सोबती आहे लग्नात नवरदेव आणि नवरी मोहाच्या पाटावर किंवा पिढ्या वर बसलेले असतील, लग्नात मोवई चे खांब केंद्रस्थानी लावले जाते, या खांबावर सुंदर नक्काशी काढली जाते. मोहापासून फक्त दारूच मिळते ( हीच कल्पना आजही अनेक जनसामान्यांची आहे ) गडचिरोलीतील महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी तयार केलेले मोहाची बिस्किट्स संपूर्ण देशात प्रसिद्ध होत आहे, दाळीच्या पुरणपोळी पेक्षा मोहाची पुरणपोळी अतिशय स्वादिष्ट असते, शासनाने जर मोहावरील प्रॉडक्ट्स ला चालना दिली तर या संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे जीवन उंचावू शकते. काजू हे भारतातील फळ नाही ते पोर्तुगीजांनी बाहेरून गोव्याकडे आणलेले आहेत, परंतु मागील शंभर वर्षात काजू पासून बनवलेली “फेणी” निव्वळ राजाश्रय मिळाल्यामुळे प्रसिद्धीस आला व खूप मोठा रोजगार निर्माण झाला, परंतु आपण आपल्या जंगलातील व गावाच्या वेशीवर व अवती भोवती मोठ्या संख्येने असलेल्या मोहाच्या झाडाकडे लक्ष देऊ शकलो नाही
आणि आदिवासी समाजाचा कल्पवृक्ष दुर्लक्षित राहिला ?व तसा राजाश्रय मोहाला दिला गेला नाही.व जग एका अतिशय सुंदर व संपन्न अश्या आयुर्वेद प्रॉडक्ट्स मुकलेले आहे कारण यावर संशोधन झाले नाही. इतकी ती वेगळी आहे, परंतु आपल्याकडील तयार झालेला प्रोडक्ट अतिशय खराब आणि इंपोर्टेड म्हणजेच अतिशय सुंदर हा भ्रम आपल्या भारतीयांच्या मनात झाल्यामुळे आमची गोची झाली आहे.
मोह फुलांची भाजी सुद्धा केली जाते, टोळीच्या तेलात फ्राय करून तिखट मीठ टाकून, मोहफुलांची भाजी केली जाते. वाळलेल्या मोहात चण्याची किंवा लाखोरी ची डाळ टाकून मोहांचा वरण सुद्धा केला जात होता. आजकाल गावागावांत भाज्या उपलब्ध झालेल्या आहेत, पावसाळ्यातील दिवसात अशा भाज्या मिळत नव्हत्या तेव्हा मोहाचे वरण सुद्धा केले जात होते. जवस आणि मोह भाजून व कुटून सुपारी सारखे खेड्यामध्ये खातात. मोहफुले पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी काढून ते शिजवले जाते, ते अगदी शहदासारखे बनते त्याला पोळी सोबत खाल्ले जाते. कधी कधी यात मुरले टाकून त्याचे लाडू तयार केले जातात, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे मोठ्या प्रमाणात माविमच्या बचत गटाच्या माध्यमातून मोहाची लाडू बनवण्यात येत आहे ,या लाडूला संपूर्ण देशभरातून मोठी मागणी होत आहे, मोहाची वाळलेली फुले भाजून त्यात गूळ टाकून त्याचे लाडू बनवले जातात यामुळे खोकला होत नाही
मोहापासून आणखी एक पदार्थ मिळतो तो म्हणजेच टोळ होय. मोह संपल्यानंतर फुलांचे ऐवजी फळ लागते, तो म्हणजे टोळ होय. टोळीचे तेल काढले जाते, आयुर्वेदात या तेलाला महत्त्वाचे स्थान आहे. हात पाय दुखल्यास खूप थकल्यास आम्ही मेडिकल मधून अनेक तेल विकत घेतो, टोडीचे तेल गरम करून हात-पाय चुडा आणि दहा मिनिटात तुमच्या शरीराला मिळालेला आराम स्वतः अनुभव घेऊन पहा. टोळीचे तेल डोक्याला लावतात, याला अमिताभ बच्चन सारख्या एखाद्या माणसाने नवरत्न सारखी फक्त जाहिरात करायची गरज आहे, तो सातासमुद्रापार विकला जाईल याची शंभर टक्के खात्री आहे. तीस वर्षांच्या अगोदर गावातील लोकांनी टोळीच्या तेलाची भाजी फ्राय केली आहे, देवळात टोळीच्या म्हणजेच मोहाच्या तेलाचा दिवा लावला गेला आहे, आधी गावागावांमध्ये तेलाचे घाणे असायचे, टोळ टाकून त्यात तेल वेगळे आणि ढेप वेगळी केली जात होती, जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक होती. परंतु या सर्व गोष्टींना आता आम्ही मुकलो आहोत. आमच्या विकासाचा मॉडेल जंगल, त्यातील पदार्थ या सगळ्यांचा नाश कसा होईल आणि विदेशातून आलेले बाजारू पदार्थ आमच्या घरापर्यंत कसे येतील असाच प्रयत्न सुरू असलेला दिसतो ,आज राज्य सरकारने मोहापासून तयार होणाऱ्या ( दारू सोडून ) औषदिय तत्वांचा अभ्यास करणे गरजेचे आहे ! तसेच मोहाच्या झाडापासून मिळणाऱ्या टोळीच्या आतील बियांपासून आंघोळीची साबणे तयार केले जातात, टोळीपासून खाण्याचे अनेक पदार्थ सुद्धा बनवले जातात.मोहाचे झाड अत्यंत उंच असल्याने आणि तप्त उन्हाळ्यात सुद्धा हिरवेगार असल्याने या झाडाचे पर्यावरणीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत मोठे महत्त्व आहे, अनेक प्राणी आणि पक्षी यांचा आश्रय म्हणजेच मोह आहे. मोहाच्या झाडावर अनेक वानर येऊन मोहफुले खातात अस्वल, गावठी डुक्कर, रान डुक्कर, ससा, सांबर, नीलगाय, शेळ्या, गाई, बैल, हरीण हे सर्वच प्राणी मोहफुले खात असतात. या झाडाची बायोलॉजिकल कॅरिंग कॅपॅसिटी इतर कोणत्याही झाडांपेक्षा जास्त आहे.असे माझे ठाम मत आहे.
एवढं सगळं असताना महाराष्ट्रात मात्र आज महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या वतीने सरसकट मोहाची झाडे सुद्धा कापली जाऊन त्या ठिकाणी फक्त सागवन आणि बांबू लावला जातो, मागील चार महिन्यात वडसा(गडचीरोली-चंद्रपुर सीमेगत) जवळील अनेक गावांतील सर्वच झाड सरसकट कापली गेली, गावातील गावकऱ्यांनी किमान मोहाची झाडे कापू नका फळांची झाडे कापू नका अशा प्रकारची विनंती शासनाला केली परंतु त्यांच्या मागणीकडे शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामसभा आता सुप्रीम कोर्टात गेलेल्या आहेत. ज्या सागवणाला लावले जाते त्याची बायोलॉजिकल कॅरिंग कॅपॅसिटी किती ? याचा आपण कधीच विचार करत नाही. सागावणाच्या झाडावर एक पक्षांचा घरटा दाखवा आणि बक्षीस मिळवा अशा प्रकारची पैज लावायची माझी इच्छा आहे.
हे सर्व होताना एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती अशी की मोहाचे झाड राज्याचे झाड होण्यासाठी आपण काही हातभार लावू शकतो का ? आयुर्वेद चिकित्सा दृष्टिकोनातून मोह खूप महत्वाचा आहे असे मला वाटते !!
त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात विविध फळांची झाडे लागवड करतांना मोह वृक्षाची लागवड सुद्धा करण्यात यावी .
Maharashtra News Media सच की आवाज