Breaking News

*तुलसीदास जयंती समारंभाचे भव्य आयोजन संपन्न*

*तुलसीदास जयंती समारंभाचे भव्य आयोजन संपन्न*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- श्री बिंझाणी सिटी कॉलेज, तायवाडे कॉलेज आणि व्ही.एम.व्ही.कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदीतील महान कवि गोस्वामी संत तुलसीदास यांच्या जयंती समारंभाचे भव्य आयोजन, आभासी पध्दतीने करण्यात आले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला गृह-अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. साधना क-हाडे यांनी सुमधुर स्वरांत सरस्वती वंदना आणि संत तुलसीदास यांचे दोहे सादर केलेत. महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक निखिल जोशी यांनी संत तुलसीदास यांच्या पदांचे भजन स्वरूपात अतिशय सरस गायन केले. समारंभाचे प्रास्ताविक व्ही.एम.व्ही. कॉलेजच्या स्नातकोत्तर हिंदी विभागप्रमुख डॉ. सोनू जेसवानी यांनी केले. तायवाडे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शरयू तायवाडे यांनी स्वागतपर भाषण केले. त्यांनी या संयुक्त आयोजनाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. बिंझाणी सिटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजीत मेत्रे यांनी प्रासंगिक उद् बोधन केले. ते म्हणाले, “आपण इतिहासाचा मागोवा घेतला तर आपल्याला असे लक्षात येईल, की गौतम बुद्धांनंतर केवळ तुलसीदास हेच एक असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी मानवतावादाला एका व्यापक परिघात प्रतिष्ठित केले.”
वक्तात्रयींमध्ये पहिल्यांदा रा.तु.म. नागपुर विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. वीणा दाढे यांनी त्यांचे तुलसीदासांच्या काव्यावरचे चिंतन प्रकट केले. त्या म्हणाल्या, “तुलसीदासांच्या काव्यातील सार्वभौमिक जीवन मूल्यांचे चित्रण, हीच त्यांची मानवजातीला दिलेली वैश्विक देण आहे. अवधी या जनभाषेच्या माध्यमातून तुलसीदासाने उदात्त जीवन मूल्ये प्रसारित केले. हे तुलसीदासांचे अविस्मरणीय कार्य आहे. तुलसीदासांच्या रचना जगाला शांतता आणि सद् भाव यांचा संदेश देतात. तुलसीदास ख-या अर्थाने महामानव होते.”
नागपूर शहराच्या माजी महापौर आणि शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांनी त्यांच्या प्रमुख वक्तव्यात तुलसीदासाच्या रामचरितमानसातील संभाषण कौशल्याचा आगळा-वेगळा पैलू उलगडून दाखविला. त्यांच्या व्यख्यानात त्या म्हणाल्या, ” रामचरितमानसातील बाल कांड, किष्किंधा कांड, अरण्य कांड, सुंदर कांड या अध्यायांत संभाषण कौशल्याचे अनोखे नमुने तुलसीदासांनी प्रस्तुत केले आहेत. हनुमान,सुरसा, विभिषण, रावण, राम, सीता यांचे रामचरितमानसातील संवाद विलक्षण प्रभावी आहेत. रामचरितमानस हा ग्रंथ व्यावहारिक कौशल्याचा आदर्श सादर करतो”
पुण्याचे ज्येष्ठ साहित्यिक आणि आकाशवाणी केंद्राचे माजी सहायक निदेशक डॉ. सुनील देवधर यांनी “तुलसी के राम” या विषयाभोवती आपले व्याख्यान गुंफले. ते म्हणाले, “जागतिक स्तरावर शेक्सपियरनंतर फक्त तुलसीदासावरच इतक्या मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले असेल. तुलसीदासाचा राम काल्पनिक पुरुष नाही, राम ऐतिहासिक पुरुष नाही, राम या देशातील लोकशाहीचे प्रकटीकरण करणारे एक जननायक आहेत.”
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि व्ही.एम.व्ही. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात तुलसीदासाच्या प्रदेयाची प्रशंसा केली. ते म्हणाले, “जवळजवळ पांच हजार वर्षांची भारतीय परंपरा पंधराव्या शतकात पुनर्जीवित करण्याचे श्रेय तुलसीदासाच्या लेखणीला आहे. ती लेखणी निश्चितच वंदनीय आहे.”
आभार प्रदर्शन तायवाडे कॉलेजचे हिंदी विभागप्रमुख डॉ. गजानन पोलेनवार यांनी केले. समारंभाचे सुचारू सूत्र-संचालन समन्वयक डॉ. सुधा जांगिड यांनी केले.
अतिथींचा परिचय डॉ. प्रियंका पंडित, डॉ. राहुल वाघमारे आणि प्रा. दिलीप गिरहे यांनी करून दिला. तांत्रिक व्यवस्था काँम्प्यूटर विभाग प्रमुख प्रा. पारस वाढेर, प्रा. मेहुल घिया व प्रा. खुशबू वर्मा यांनी सांभाळली. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा आभासी समारंभ सफल झाला.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …