*काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना प्राथम्याने प्रवेश द्या-जिल्हाधिकारी आर. विमला*
*बाल संगोपन योजनेचा लाभ घ्या*
*जिल्हा बाल संरक्षण समितीचा आढावा*
*बाल कल्याण समिती गठीत*
नागपूर-काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना बालगृहात प्रवेश देणे महत्वाचे असून प्रवेशापासून बालक वंचित राहू नये. कोणत्याही प्रवेशितांचे तसेच दत्तक संस्थेतील बालकांचे प्रकरण प्रलंबित ठेवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बाल संरक्षण व बाल कल्याण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी त्याबोलत होत्या. बाल कल्याण समितीच्या नुतन अध्यक्षा छाया गुरव (राऊत), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. अपर्णा कोल्हे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, बाल कल्याण समितीच्या सदस्य विजया शहा, प्रियंका चोखारे, विनायक नंदेश्वर, शिवशंकर सेलोकर, समितीचे अन्य शासकीय व अशासकीय सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या पालकांच्या बालकांना बाल कल्याण समिीने त्वरित उपाययोजना करुन त्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. तहसिलदार व शिक्षण विभागाचे सहकार्य घ्यावे, आरटीई अंतर्गत सर्व बालकांना सामावून घ्यावे. त्यासोबत बालकल्याण समितीअंतर्गत संस्थेतील सोयी सुविधा, प्रवेशित दाखले,स्वच्छता, अन्न, आरोग्य व्यवस्थेबाबत तपासणी अहवाल नियमित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास सादर करावा, असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी नवनियुक्त अध्यक्ष व समितीचे सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व समितीची प्रलंबित कामे जोमाने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
रस्त्यावर भटकणाऱ्या बालकांची तपासणी करुन त्यांना बालगृहात सामावून घ्यावे. त्याचबरोबर बालकामगारांबाबत कामगार विभागांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याबाबत विशेष जनजागृती करण्यात यावी. जिल्ह्यातील आठ बालविवाहांना रोखण्यात येवून संबंधितावर कार्यवाही केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी समितीच्या कामाबाबत माहिती दिली. कोरोना आजाराने पालक गमावलेल्या 556 मुलांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला असून उर्वरित 919 मुलांबाबत कार्यवाही सुरु आहे. बालगृहातील बाहेरील जिल्ह्यातील व परराज्यातील आठ मुलांमुलींना पोलीस विभागाच्या मदतीने त्यांना त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले. दत्तक प्रकरणबाबत जिल्ह्यात एकूण पाच दत्तक संस्था कार्यरत असून 50 बालके शिशुगृहात दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.
Maharashtra News Media सच की आवाज