गडचिरोली जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या पाच जणांचे कोरोना नमुने पॉझिटीव्ह
विशेष प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर
*गडचिरोली: जिल्हयात बाहेरून आलेल्या व प्रशासनाकडून संस्थात्मक क्वारंटाइन केलेल्या पाच प्रवाशांचे कोरोना कोविड नमुने काल रात्री पॉझिटीव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यात कुरखेडा येथील चार, तर चामोर्शी येथील एका प्रवाशाचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी शासनाने विविध जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वजिल्ह्यात येण्याची परवानगी देणे सुरु केल्यानंतर अनेक जण जिल्ह्यात आले आहेत. त्यात विद्यार्थी, कर्मचारी, व्यावसायिक व मजुरांचाही समावेश आहे. असेच काही मजूर १६ मे रोजी मुंबई येथून कुरखेडा व चामोर्शी येथे आले. आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. काल रात्री उशिरा नमुना अहवाल प्राप्त झाला. त्यात कुरखेड्यातील दोन जणांचा, तर चामोर्शी येथील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आज पहाटे तिन्ही कोरोनाबाधित व्यक्तींना जिल्हा रूग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात हलविण्यात आले. त्यानंतर आज दुपारी पुन्हा कुरखेड्यातील दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हे दोघेही पहिल्या रुग्णासोबतच संस्थात्मक क्वारंटाईन होते. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेश वॉर्डात हलविण्याची प्रक्रिया सुरु केल्याची अधिकृत माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
संबंधित रूग्णांकडून त्यांच्या प्रवासाचे तपशिल घेणे सूरू आहे. पाच जण कोरोना पॉझिटीव्ह झाल्याने आता गडचिरोली जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये झाला आहे. जिल्हयातील नागरिक व बाहेरून आलेल्या प्रवाशांनी अधिक काळजी घेणे आता गरजेचे आहे. सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.
*कोरोना अपडेट*
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत सुरु राहणार; रविवारी सर्व दुकाने बंद
Monday, 18th May 2020 02:01:48 PM
गडचिरोली,ता.१८: कोवीड-१९च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आज आदेश जारी करुन जिल्ह्यातील सर्व दुकाने सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, रविवारी सर्व दुकाने बंद राहतील. हा आदेश आज १८ मेच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून, ३१ मेपर्यंत लागू असणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी ८ मे रोजी आदेश जारी करुन सर्व दुकाने सातही दिवस सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत सुरु करण्याचे, तसेच केस कर्तनालयेही सुरु करण्यास परवानगी दिली होती. परंतु आज जिल्ह्यात ५ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी आज नव्याने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार दुकाने सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरु राहतील, मात्र, रविवारी सर्व दुकाने बंद राहतील. रविवारचा आठवडी बाजारही भरणार नाही. शिवाय केस कर्तनालये पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांनी आपापल्या अखत्यारितील कार्यालयांमध्ये शंभर टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. सर्व रुग्णालये, पॅथालॉजी केंद्रे, सोनोग्राफी केंद्रे, औषध विक्रेते यांना वेळेचे बंधन राहणार नाही. ऑटो रिक्शा व सायकल रिक्शामध्ये एक चालक व दोन प्रवासी घेऊन वाहतूक सेवा सुरु करता येईल. हे सर्व करताना सामाजिक अंतर ठेवून शासनाचे नियम पाळावेच लागतील, तसेच सर्व व्यक्तींच्या आंतर जिल्हा हालचाली विनापरवाना बंदच राहतील. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने प्रशासकीय कारणास्तव वाहतूक करता येईल आणि जिल्ह्यांतर्गत प्रवासाला कोणत्याही पासची गरज नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
*काय सुरु काय बंद असेल*
सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, कँटीन, मॉल्स, खरेदीसंकुले, व्यायामशाळा, क्रीडासंकुले, जलतरणतलाव, लॉज,, मनोरंजनपार्क, प्रेक्षागृहे, बार, सभागृहे बंदच राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम बंद राहतील, पानटपऱ्या, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने बंद राहतील, पेट्रोल, डिझेलच्या विक्री वा खरेदीस तहसीलदाराकडून परवाना घेण्याची आवश्यकता असणार नाही. विवाह कार्यक्रमास जास्तीत जास्त ५० लोकांच्या जमावास व अंत्यसंस्कारास २० लोकांना परवानगी असेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सामाजिक अंतर राखून दैनंदिन बाजार सुरु राहील. पार्सल स्वरुपात सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अटीवर छोटे उपहारगृह, स्वीट मार्ट, फरसाण सेंटर, चहा-नाश्ता सेंटर सुरु राहतील. परंतु प्रत्यक्ष दुकानात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्थेस मनाई असणार आहे. संध्याकाळी ७ ते सकाळी ७ या कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. काही हॉटेल्स, लॉज, खासगी विश्रामगृहे, शासकीय, निमशासकीय, खासगी इमारती संस्थात्मक विलगीकरणासाठी अधिग्रहीत केल्या जातील, त्या इमारतींची देखभाल, वीज, पेयजल उपलब्ध करुन देणे हे इमारत मालकास बंधनकारक राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच विलगीकरण कक्षाच्या स्वच्छतेसाठी तहसीलदारांच्या मागणीनुसार, ग्रामपंचायत सचिव किंवा नगर परिषद वा नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हास्तरावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्किट हाऊस, विश्रामगृहे व वनविभागाची विश्रामगृहे अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावरील विश्रामगृहे जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या, तर तालुकास्तरावरील विश्रामगृहे तहसीलदारांच्या परवानगीशिवाय इतरांना आरक्षित करण्यात येऊ नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज