नक्षल्यांनी लावलेल्या बॅनरची गजामेंढीवासीयांनी केली होळी
गडचिरोली प्रतिनिधी- सूरज कुकुडकर
गडचिरोली: आदिवासींचे कैवारी असल्याचे भासवून त्यांच्यावरच अत्याचार करण्याचे काम नक्षलवादी करीत असतील तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा देत आज गजामेंढी येथील नागरिकांनी नक्षल्यांच्या बॅनरची होळी केली.
२० मे रोजी नक्षल्यांनी धानोरा-सावरगाव मार्गावरील गजामेंढी गावाजवळ झाडे आडवी टाकून रस्ता अडविला होता. शिवाय चार वाहनांची जाळपोळही केली होती. त्यादिवशी नक्षल्यांनी जिल्हा बंदचे आवाहन केले होते. परंतु अनेक गावांतील नागरिकांनी ३४ निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या सृजनक्कासाठी बंद का पाळायचा, असा सवाल करीत बंदला तीव्र विरोध दर्शविला होता. आज गजामेंढी येथील नागरिकांनी नक्षल्यांच्या बॅनरची होळी करुन पोलिसांच्या मदतीने जाळलेली वाहने बाजूला केली.
२० मे रोजी टिपागड दलमचा नक्षली सावजी तुलावी, कंपनी क्रमांक ४ चा नवलूराम तुलावी, प्लाटून क्रमांक ४ चा कमांडर राजा मडावी यांच्यासह १५ ते २० नक्षली गावात आले होते. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून गावकऱ्यांकडून पैसे व धान्य नेले. त्यानंतर सर्व गावकऱ्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे करीत वाहनांची जाळपोळ केली, अशी माहिती गजामेंढीच्या नागरिकांनी पोलिसांना दिली. दरम्यान गजामेंढी येथील नागरिकांनी नक्षलवाद्यांचे बॅनर जाळत त्यांचा खरा चेहरा जगापुढे आणल्याबद्दल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांचे कौतुक केले आहे. नक्षल दलममध्ये कार्यरत आदिवासी तरुण, तरुणींनी तेलगू नक्षल्यांच्या आमिषाला बळी न पडता आत्मसमर्पण करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज