Breaking News

*गोदामे तुडुंब भरलेली,जागेअभावी उन्हाळी धान खरेदी अधांतरी*

*गोदामे तुडुंब भरलेली,जागेअभावी उन्हाळी धान खरेदी अधांतरी*

 

गड़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर

गडचिरोली/कोरचीमागील वर्षीच्या खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळाने प्रचंड धान खरेदी केल्याने गोदामे तुडुंब असून, धान साठविण्यास जागाच नसल्याने व महामंडळाने धानाची उचलच न केल्याने अनेक ठिकाणी उन्हाळी धान खरेदी वांद्यात सापडली आहे.

मागील वर्षीच्या खरीप हंगामात आदिवासी महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयातर्फे कोरची व कुरखेडा तालुक्यांत १४ आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत ३ लाख ६ हजार ५२७ क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. त्यातील ४५ हजार ६१० क्विंटल धानाची उचल करून भरडाई करण्यात आली. त्यामुळे अजूनही हजारो क्विंटल धान गोदामात व उघड्यावर पडून आहे. कोरची तालुक्यातील बेतकाठी, कोटगुल व बेळगाव या केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी उन्हाळी धान खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु खरीप हंगामात या तिन्ही केंद्रावर ५० हजार ९८५ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. त्यातील केवळ १२ हजार ५६७ क्विंटल धानाची उचल झाली असून, अजूनही ४० हजार क्विंटल धानसाठा केंद्रावरच पडून आहे.

खरीप हंगामात उत्पादनात झालेली वाढ, आधारभूत केंद्रावर बाजारभावाच्या तुलनेत मिळणारा योग्य भाव, तातडीने रक्कम जमा होण्याची सुविधा, तसेच धानावर मिळणारा बोनस यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रांनाच पसंती दिली. परिणामी आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत एप्रिल महिन्यापर्यंत धान खरेदी करण्यात आली. यामुळे अनेक ठिकाणची गोदामे तुडुंब भरली, तर काही ठिकाणी उघड्यावरही धान ठेवावे लागले. उघड्यावरील धान आदिवासी विकास महामंडळ उचल करुन त्यांची राईस मिल धारकांकडून भरडाई करुन तो तांदूळ जिल्हा पुरवठा विभागाला देत असतो. यावेळी प्रचंड उत्पादन झाल्याने विक्री, खरेदी व उचल हे चक्र खोळंबले आहे. अशातच कोरोना प्रादुर्भाव झाल्याने संचारबंदी व जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला. परिणामी पुन्हा त्यात खोडा निर्माण झाला

कोरची तालुक्यात बोटावर मोजता येईल एवढी गोदामाची संख्या, उघड्यावर ठेवलेला धान, आणि त्यातच धानाची उचलच होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तालुक्यातील कोरची, मसेली, बेतकाठी, मर्केकसा, बोरी, कोटरा, बेळगाव, कोटगुल व इतर केंद्रांवर खरेदी केलेले खरिपातील हजारो क्विंटल धान अजूनही उघड्यावर पडून आहेत.

अशातच उन्हाळी धान विक्रीसाठी तयार झाले. परंतु खरीप धानाची उचल केली जात नाही;तोपर्यंत उन्हाळी धानाची खरेदी केली जाणार नाही, अशी स्थिती निर्माण केली जात आहे. मृग नक्षत्र १०-१२ दिवसांवर येऊन ठेपला असून, अवकाळी व वादळी पाऊस दर आठवड्याला हजेरी लावत आहे. त्यामुळे उन्हाळी धान पावसात भिजून सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तीन वर्षांपूर्वी उघड्यावर ठेवलेले धान सडल्याने आदिवासी विकास महामंडळाने फेकून दिले होते. तशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप धानाची धानाची उचल करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कोरची तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …