*शंभर नंबरी कोरोना*- रमेश कुलकर्णी

कोरोना ‘विचित्र आणि चिकट’ रोग आहे. तो लवकर पिच्छा सोडणार नाहीच, याची कल्पना सर्वसामान्यांना एव्हाना आली आहे. कोरोनाच्या आगमनाची ‘शंभरी’ नुकतीच झाली. यात अनेक विषय गंभीर तथा मूळ स्वरूपात समोर आले. आपल्याकडील आर्थिक, औद्योगिक, आरोग्य व शैक्षणिक क्षेत्राचा पाया किती तकलादू आहे, याचा अंदाज आला. आर्थिक विषमतेचे भयावह स्वरूप निदर्शनास आले. देशात ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याची योजना घोषित झाली. योजना गोरगरिबांसाठी दिलासादायक आहे. परंतु यातून कोट्यावधी लोकांना साजेसे काम नाही, असा मतप्रवाह समोर आला तर त्यात चुकीचे काय? कष्टकरी जनता त्रासात आहे हे मात्र वास्तववादी चित्र आहे.
एकीकडे रिलायन्स ग्रुपमध्ये मोठ्या परदेशी गुंतवूणकदारांची रीघ लागली. त्यातून मुकेश अंबानी परिवार कर्जमुक्त झाल्याचे सुखद चित्र समोर आले, तर दुसरीकडे सर्वसामान्य अधिकाधिक कर्जबाजारी होत गेला आहे. घेतलेल्या कर्जाचे मासिक हफ्ते फेडण्याची ताकद मध्यमवर्गीय नोकरदारांमध्ये उरली नाही. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, अशी विरोधाभासी स्थिती अस्वस्थ करणारी आहे.
अनलॉकनंतर चारचाकी व दुचाकी मोटारगाड्यांचे शोरुम उघडले. त्यापुढे प्रचंड झुंबड उडाल्याचे चित्र समोर आले. अर्थात अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी ते समाधानी चित्र असले तरी आर्थिक विषमतेची दरी किती खोल होत चालली आहे, याचे दर्शन घडविणारी आहे. चारचाकी गाडीमध्ये भरघोस सूट मिळते आहे म्हणून खरेदीदार गर्दी करतात. तर, दुसरीकडे पगारात झालेल्या कपातीमध्ये आपला घरसंसार व राशन चालणार नाही, म्हणून बायकोचे सौभाग्य लक्षण असलेले मणी, मंगळसूत्र गहाण टाकून पैसे मिळविण्याची धडपड करणारा मध्यमवर्गीय नोकरदार व कष्टकरी आहे. एकीकडे नवीन वस्तू खरेदी करण्याची घाई तर दुसरीकडे घरातील वस्तू विकून जगण्यासाठी केलेली अगतिकता जाणवते. ही रुंदावत असलेली आर्थिक दरी सुदृढ व निकोपी समाजाचे निश्चित लक्षण नाही.
कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे, हा नवा कानमंत्र लोकांना देण्यात आला. जगत असताना पोटाला भूक लागते हे मात्र सोयीस्कररीत्या विसरल्या गेले. जगायचे असेल तर जेवावेच लागते. जेवणाला कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध असल्याचे अजून तरी स्मरत नाही. त्यामुळे कोरोनासोबत जगत असताना, पोटातील भुकेच्या संघर्षाचे कसे निराकरण करावे, हाच मोठा प्रश्न आहे. घरातील वस्तू विकण्याचा प्रकार मनुष्य कितीकाळ करणार? त्याला मर्यादा आहेत. घरातील वस्तू संपल्यानंतरही भूक लागणारच आहे. श्रम करण्याची तयारी आहे, परंतु हाताला साजेसे काम नाही. कामाचा योग्य मोबदला नाही. खासगी नोकरदारांची पगार कपातीमुळे मानसिक अवस्था बिघडलेली आहे. बेरोजगारांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे.
सरकारी यंत्रणेकडून दिलासा देण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे सर्वेसर्वा शक्तिकांत दास यांनी समोर येऊन ठोस उपाययोजना घोषित केल्या. आपल्या जीडीपीच्या दहा टक्के रक्कम म्हणजे तब्बल २० लाख कोटींचे पॅकेज घोषित केले गेले. उपाययोजना खरोखरच प्रभावी आहेत, परंतु अंमलबजावणीचे काय करणार? कर्ज घ्या.. आपले उद्योग सुरूकरा़. नोकरी न करता, नोकरी देणारे बना़़़ अशा विविध घोषणा स्वयंरोजगाराकरिता केल्या गेल्यात, परंतु वास्तव वेगळे आहे. कर्ज मागणाºयाला सरकारी व बँकेची वागणूक अतिशय उर्मट, अपमानास्पद व उडवाउडवीची असल्याचे प्रकार समोर आले. हजारो पानांचे प्रोजेक्ट, दस्तऐवज, किचकट प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतरही छोट्या गोष्टींकरिता गाडी अडकून पडते. कर्ज मिळतच नाही, पण मिळतो फक्त मनस्ताप आणि तो जिव्हारी लागतो. कसे ग्रामीण भागात उद्योजक निर्माण होणार? सूक्ष्म, लघु व मध्यम श्रेणीतील उद्योग कसे उभारी घेतील? सरकार, जनता व योजना यामध्ये सांगड घालावी लागणार आहे. खचलेल्या मनाला आत्मविश्वासाने सांधावे लागेल. सरकारी योजनांसंबंधी विश्वास निर्माण करावा लागेल. प्रत्यक्षात अंमलबजावणीची गती वाढवावी लागणार आहे. आशावादी मनाला आत्मनिर्भरतेची उभारी देण्यासाठी एवढे पुरेसे आहे.

जाता जाता : सीबीएसई दहावीच्या पाठोपाठ राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल लागला. कोरोनाने जगणे मुश्किल केले असताना, शिक्षकांनी मात्र आपले काम चोखपणे बजावले. नेहमीप्रमाणे यावेळीही मुलींच्या यशाचा चढता आलेख सुखावणारा आहे. कुणी पास होणार तर कुणी नापास, यात खचून जाण्यासारखे काहीच नाही. अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी ध्येयगाठण्यासाठी सतत प्रयत्नरत असणाºया मुंगीला डोळ्यासमोर ठेवावे म्हणजे आयुष्य किती मोलाचे आहे ते कळेल.. आयुष्य सुंदर आहे, यात अपयशाने फारसा फरक पडत नाही. शालेय अपयशातून भरारी घेतलेले अनेक नामवंत आपल्या आजूबाजूला असतात. त्यामुळे गेलेली परीक्षा परत देता येते, पण आयुष्य नाही हे कायम लक्षात ठेवून ध्येय निश्चिती करा… कुटुंब सोबत असतेच.
Maharashtra News Media सच की आवाज