*साडेसहा महिन्यांनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे १ ऑगस्टला गडचिरोलीत*
गड़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर
गडचिरोली: राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी १ ऑगस्टला जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. साडेसहा महिन्यांनंतर श्री.शिंदे यांचा हा गडचिरोली दौरा आहे.
शनिवारी दुपारी १२ वाजता श्री.शिंदे यांचे हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आगमन होईल.त्यानंतर ते जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांची भेट घेऊन अत्यावश्यक साहित्याचे वाटप करतील.दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते विविध विभागांचा आढावा घेतील. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर नागपूरकडे प्रयाण करतील.
*21 जानेवारीनंतर शिंदे प्रथमच गडचिरोलीत*
एकनाथ शिंदे हे साडेसहा महिन्यांनंतर गडचिरोलीत येत आहेत. जानेवारी महिन्यात एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. त्यानंतर २१ जानेवारीला ते गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पुढील तीन महिने ते गडचिरोलीत आले नाही. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनामुळे देशभर टाळेबंदी लागू झाली. त्यानंतर १६ एप्रिल रोजी भूकंप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. श्री.वडेट्टीवार यांनी अल्प कालावधीत आढावा बैठकांचा सपाटा लावून निधी खेचून आणला. मात्र, आठवडाभरापूर्वीच वडेट्टीवार यांच्याकडील प्रभार काढून घेत पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडेच जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले. यापुढे तरी श्री.शिंदे यांनी जिल्ह्याला नियमित भेट द्यावी, अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त केली जात आहे.
Maharashtra News Media सच की आवाज