*निराधार, वृद्ध, अपंगाच्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी*
विशेष प्रतिनिधि- निखिल खराबे
दिल्ली/ मुम्बई/नागपुर– केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत संजय गांधी निराधार व स्वावलंबन अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजनेत पात्र ठरणाऱ्या नागरिक व महिला यांना योजनेपासुन वंचित रहावे लागत आहे.
तालुका स्तरावर या योजनेकरीता अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांची प्रकरण मंजूर करण्याकरीता शासकीय समित्यांची स्थापना करण्यात येते व या समितीमार्फत अर्जाची छाणनी करून निकषात बसणाऱ्या गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिल्या जात असतो. परंतु तालुकास्तरावर १ वर्षांपासून संबंधित कार्यालयात अर्ज धूळ खात पडले आहेत. तर प्रशासनाकडुन अशा गरजू, वृद्ध, निराधार, अपंग व दृर्धर आजाराने त्रस्त असलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज हेतुपुरस्पररित्या नामंजूर करण्यात येत असल्यामुळे व नामंजूर प्रकरणाची कारणे देखील लाभार्थ्यांना सांगण्यात येत नसल्यामुळे शासन व प्रशासनाविरुद्ध लाभ घेवू इच्छिणाऱ्या गरजू लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे.
करिता याबाबत प्रलंबित असलेल्या सर्व अर्जाचा सर्व निपटारा करून संबधीतांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रशासनाला स्पष्टपणे निर्देश द्यावेत, याबाबतच्या समित्याची त्वरित पुर्नरचना करावी, कुठलेही कारण नसतांना अर्ज नामंजूर करण्याचे प्रकार थांबविण्यात यावे, याबाबत सकारात्मक निर्णय घेवून या योजनेची प्रभावीपणे अमलबजावणी करावी व संबधीतांना न्याय व लाभ मिळवून द्यावा. अशी मागणी नागपूर जिल्हा ग्रामीण महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा तक्षशिला वागधरे, सामाजिक कार्यकर्ते राहुल घरडे यांनी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पालक मंत्री नितीन राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे.
शिष्टमंडळात योगिता इटनकर, चंदा येळने, नंदा तिजारे, जयमाला शेंडे, नलिनी मेश्राम, मनमोहीत घोडेस्वार, अशोक रामटेके, मंन्साराम हजारे, परमेश्वर वाघमारे, गुरुदास केळझरकर, बंडू वैद्य, नागसेन निकोसे, राजु गोरले,अरविंद वाळके, मयूर हिरेखन, अक्षय रामटेके, श्रीकांत शेंडे, शिवशंकर कंगाली, विनय गजभिये, नत्थुजी धोंगळे इत्यादींचा समावेश होता.
Maharashtra News Media सच की आवाज